मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून प्रयागराजकडे महाकुंभसाठी जाण्यासाठी रेल्वे सुरू आहे. विशेष गाड्याचंही नियोजन करण्यात आलं आहे. मात्र, शनिवारी रात्री उशिरा प्रयागराजकडे जाणाऱ्या दोन गाड्या उशिराने आल्या. त्यामुळे स्टेशनवर भाविकांची तुफान गर्दी झाली होती.
ही गर्दी इतकी वाढली की, स्टेशनवर पाय ठेवायला जागा नव्हती. गर्दी जास्त झाल्यामुळे काही भाविकांना श्वास घेण्यास त्रास झाला. त्यामुळे स्टेशनवरच ते बेशुद्ध पडले. रात्री उशिरा माहिती समोर आली की चेंगराचेंगरीची घटना घडली. या दुर्दैवी घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ३ लहान मुलांचा समावेश आहे. जखमी भाविकांची प्रकृती खालावली. त्यांना तातडीने नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
सुरुवातीला
दिल्ली पोलिसांनी चेंगराचेंगरीची घटना घडली नसल्याचा दावा केला होता. दोन रेल्वे गाड्या या प्रयागराजकडे जाणार होत्या. पण त्या उशिराने रेल्वे स्टेशनवर आल्या. त्यामुळे भाविकांची प्रचंड गर्दी वाढली. या गर्दीमध्ये काही जणांना श्वास घेण्यास त्रास झाला त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणखी काही विशेष गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.