यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार, जलालाबादच्या ईशान्येकडील 27 किलोमीटर अंतरावर 8 किलोमीटर खोलीवर या भूकंपाचा केंद्रबिंदु होता. हा भूकंप स्थानिक वेळेनुसार रात्री 11:47 वाजता झाला. या भूकंपामुळे सध्या नऊ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असली तरी यात शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जातेय. यूएसजीएस नुसार, या भूकंपामुळे ज्यांना मध्यम ते अतिशय तीव्र धक्के जाणवले, त्यात सुमारे पाच लाख लोक प्रभावित झाले. अशा धक्क्यांमुळे कमकुवत इमारती किंवा घरांचं मोठें नुकसान झाल्याची शक्यता आहे.
advertisement
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, नांगरहार प्रांताच्या आरोग्य विभागाचे प्रवक्ते अजमल दरवेश यांनी सांगितले की, भूकंपात किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आहे आणि २५ जण जखमी झाले आहेत. तथापि, बचाव कार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो. तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी ट्विटरवर पोस्ट केले की दुर्दैवाने आज रात्रीच्या भूकंपामुळे आमच्या काही पूर्वेकडील प्रांतांमध्ये मानवी आणि आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांनी पुढे म्हटले की, स्थानिक अधिकारी आणि रहिवासी बाधित लोकांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
राजधानी काबूल आणि आसपासच्या प्रांतातील मदत पथके देखील बाधित भागात रवाना झाली आहेत. मुजाहिद म्हणाले की, सर्व उपलब्ध संसाधनांचा वापर बचाव आणि मदत कार्यासाठी केला जात आहे. भूकंपानंतर सुमारे २० मिनिटांनी, त्याच भागात १० किलोमीटर खोलीवर ४.५ तीव्रतेचा दुसरा धक्का बसला. त्यानंतर, ५.२ तीव्रतेचा आणखी एक धक्का नोंदवण्यात आला. USGS च्या PAGER प्रणालीने या भूकंपासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हा अलर्ट आर्थिक आणि मानवी नुकसानीचा अंदाज लावतो. अलर्टमध्ये म्हटले आहे की या पातळीच्या भूकंपांमध्ये व्यापक विनाश होण्याची क्षमता आहे.