'संभल महानगरपालिका क्षेत्रातील हिंदूंची लोकसंख्या 45 टक्क्यांवरून 15 टक्के झाली आहे. संभलमध्ये 1947 साली 45 टक्के हिंदू होते, आता फक्त 15 टक्के उरले आहेत', अशी पोस्ट भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी केली आहे.
उत्तर प्रदेशच्या संभल शहरातील जामा मशिदीचं सर्वेक्षण न्यायालयाच्या आदेशानंतर केलं गेलं. या सर्वेक्षणावरून संभलमध्ये हिंसाचार झाला, ज्यात 5 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. यानंतर उत्तर प्रदेश सरकारने हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले.
advertisement
स्वातंत्र्यानंतर बदलली डेमोग्राफी
एएनआयच्या वृत्तानुसार, 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा संभलमध्ये 55 टक्के मुस्लिम आणि 45 टक्के हिंदू होते, पण आता हिंदू लोकसंख्या 15 टक्के झाली असून मुस्लिम लोकसंख्या 85 टक्के झाली आहे. संभलमध्ये स्वातंत्र्यानंतर एकूण 15 दंगली झाल्या. हिंसाचाराच्या ठिकाणी आणि इतर ठिकाणांहून जप्त करण्यात आलेली शस्त्रे युनायटेड किंग्डम, अमेरिका आणि जर्मनीमध्ये बनवण्यात आली होती, असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) 12 पैकी सहा प्रकरणांमध्ये चार हजारपेक्षा जास्त पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.
हिंसाचारानंतर, उत्तर प्रदेश सरकारने संभल हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन चौकशी आयोग स्थापन केला. या आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश देवेंद्र अरोरा, माजी डीजीपी एके जैन आणि माजी आयएएस अमित मोहन प्रसाद आहेत.
संभलमधल्या या जागेवर एकेकाळी भगवान कल्की यांना समर्पित श्री हरिहर मंदिर होते, पण 1529 मध्ये मुघल सम्राट बाबरने हे मंदिर पाडून तिथे मशिद बांधली, असा युक्तिवाद कोर्टात केला गेला. याप्रकरणी वकील विष्णू शंकर जैन यांच्यासह आठ याचिकाकर्त्यांनी संभल न्यायालयात खटला दाखल केला तेव्हा वाद निर्माण झाला. सध्याची मशीद ऐतिहासिक मंदिराच्या जागेवर उभी असल्याचा आरोप करून, दिवाणी न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला (ASI) मशिदीचं सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले, त्यानंतर संभलमध्ये हिंसा उफाळून आली.