बिहारप्रमाणे आता संपूर्ण देशात SIR अर्थात Special Intensive Revision प्रक्रिया राबवली जाणार आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून देशातील सर्व मतदारांची पडताळणी केली जाणार आहे. निवडणूक आयोगाने २४ जून रोजी दिलेल्या आदेशात म्हटले होते की, बिहारच्या धर्तीवर संपूर्ण देशभरात विशेष सखोल फेरतपासणी (Special Intensive Revision - SIR) प्रक्रिया सुरू केली जाईल. मतदार याद्यांची निष्पक्षता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्याच्या आपल्या संवैधानिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी संपूर्ण देशात ही एसआयआर प्रक्रिया सुरू केली जाईल, असे आयोगाने त्या आदेशात स्पष्ट केले होते.
advertisement
सध्या बिहारमध्ये ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. राज्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ९९ टक्के मतदारांना या प्रक्रियेअंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे, तर प्रारूप मतदार यादी तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, १ सप्टेंबरपर्यंत कोणताही मतदार किंवा राजकीय पक्ष मतदार यादीतून नाव वगळल्याबद्दल किंवा चुकीचे नाव जोडल्याबद्दल दावा किंवा आक्षेप नोंदवू शकतो. या प्रक्रियेमुळे मतदार याद्या अधिक अचूक आणि पारदर्शक होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतल्याने आता याचा कुणावर आणि कसा परिणाम होणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
विशेष म्हणजे बिहारमध्ये राबवलेल्या SIR प्रक्रियेमध्ये नेपाळ, बांगलादेशी आणि म्यानमारमधून आलेल्या बेकायदेशीर लोकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचं समोर आलं होतं. बिहारमधील SIR प्रक्रिये दरम्यान बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLOs) ने घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं होतं. माहिती गोळा केली होती. ज्यात निवडणूक आयोगाला मतदार यादीत नेपाळ, बांगलादेश आणि म्यानमारमधून बेकायदेशीरपणे आलेले लोक मोठ्या संख्येने आढळले आहेत.