कोण आहेत बी सुदर्शन रेड्डी?
बी. सुदर्शन रेड्डी हे मुळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी आहेत. त्यांचा जन्म 8 जुलै 1946 रोजी झाला. त्यांनी B.A., LL.B. पदवीचं शिक्षण घेतलं. 27 डिसेंबर 1971 रोजी हैदराबाद येथे आंध्र प्रदेश बार कौन्सिलमध्ये त्यांची वकिल म्हणून नोंद झाली. त्यांनी सुरुवातीला आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात Writ आणि दिवाणी खटले हाताळले. 1988 ते 1990 या कालावधीत ते उच्च न्यायालयात शासकीय वकील (Government Pleader) म्हणून कार्यरत होते.
advertisement
1990 मध्ये 6 महिन्यांसाठी त्यांनी केंद्र सरकारचे अतिरिक्त स्थायी वकील (Additional Standing Counsel) म्हणून काम पाहिले. त्यांनी उस्मानिया विद्यापीठाचे कायदेशीर सल्लागार व स्थायी वकील म्हणूनही सेवा बजावली आहे. 2 मे 1995 रोजी त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. 5 डिसेंबर 2005 रोजी त्यांची गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती.
12 जानेवारी 2007 रोजी ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक ऐतिहासिक निर्णय दिले आहेत. 8 जुलै 2011 रोजी त्यांनी निवृत्ती घेतली. आता बी सुदर्शन रेड्डी यांना इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.
खरं तर, सुरुवातीला एनडीएकडून सीपी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर उपराष्ट्रपदाची निवडणूक बिनविरोध होईल, असं बोललं जात होतं. मात्र इंडिया आघाडीने तुल्यबळ उमेदवार मैदानात उतरवला आहे. त्यामुळे उपराष्ट्रपती पदाची ही निवडणूक चुरशीची होईल, असं बोललं जातंय.