नवी दिल्ली / श्रीनगर: पाकिस्तानच्या भारताविरोधातील कुरापती कारवाया अजून सुरूच आहेत. सीमेपलिकडून पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्याचा आणि दहशतवादी कारवायांना खतपाणी घालण्याचा मोठा कट रचला जात असल्याची माहिती समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, पाकिस्तानची लष्करी माध्यम शाखा आयएसपीआर (ISPR) ने आपली दहशतवादी रणनीती पूर्णपणे बदलली आहे.
advertisement
पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) आणि आयएसपीआर यांनी मिळून अनेक वर्षांपासून बंद असलेला ‘विलायत कश्मीर’ (Wilayat Kashmir) हा ऑपरेशन पुन्हा सक्रिय केला आहे. यामागचा उद्देश भारतात घुसखोरी वाढवणे आणि हल्ले तीव्र करणे हा आहे.
टीटीपीचं नाव, पण सूत्रं आयएसआयकडेच
सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तान आता जगाच्या नजरेत धूळफेक करण्यासाठी नवी खेळी करत आहे. या संपूर्ण कटात सार्वजनिकपणे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या संघटनेचं नाव वापरलं जात आहे. मात्र प्रत्यक्षात या कारवायांची सूत्रं आयएसआयच्या जुन्या विश्वासू नेटवर्ककडेच आहेत.
अहवालांनुसार आयएसपीआरने तांत्रिक पातळीवर टीटीपीच्या काही गटांमध्ये घुसखोरी केली असून, या गटांचा वापर भारताविरोधात करण्याची तयारी सुरू आहे.
पाकिस्तानला पुन्हा ऑपरेशन सिंदूरची भीती, LoCवर वेगवान हलचाली; सीमेवर हाय-अलर्ट
तीन नवे ‘शॅडो गव्हर्नर’ नियुक्त
या नव्या दहशतवादी कटासाठी पाकिस्तानने थेट ‘शॅडो गव्हर्नर’ नेमले आहेत. या नियुक्त्या काश्मीर आणि गिलगित-बाल्टिस्तान भागासाठी करण्यात आल्या आहेत.
डॉ. अहमद कश्मीरी: याला ‘विलायत कश्मीर’चा शॅडो गव्हर्नर बनवण्यात आलं आहे. काश्मीर खोऱ्यात पुन्हा दहशतवादी नेटवर्क उभारण्याची जबाबदारी याच्याकडे आहे.
मौलाना अब्दुल हमीद: याला गिलगित-बाल्टिस्तानमधील ‘डायमर’ उपविभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
मौलवी हबीब-उर-रहमान: याला ‘दारेल’ उपविभागाचा शॅडो गव्हर्नर नेमण्यात आलं आहे.
गिलगित-बाल्टिस्तानमध्ये नवी दहशतवादी युनिट
फक्त काश्मीरपुरते मर्यादित न राहता, पाकिस्तानने पीओकेलगतच्या भागांमध्येही आपली पकड मजबूत करण्यासाठी ‘विलायत गिलगित-बाल्टिस्तान’ नावाची नवी दहशतवादी युनिट स्थापन केली आहे. हे युनिट दारेल आणि डायमर या दोन भागांत विभागले आहे.
या दुर्गम भागांमधून दहशतवाद्यांची भरती करणे आणि भारतात घुसखोरी सुलभ करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
भारतीय सुरक्षा यंत्रणा अलर्टवर
या गुप्तचर माहितीनंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या आहेत. सीमारेषेवर नजर वाढवण्यात आली असून, हालचालींवर कडक लक्ष ठेवलं जात आहे. सुरक्षा यंत्रणांचं मत आहे की पाकिस्तान टीटीपीचं नाव पुढे करून स्वतःची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र ‘विलायत कश्मीर’ पुन्हा सुरू करणं हे थेट भारताच्या सुरक्षेला आव्हान देणारे पाऊल आहे.
या संपूर्ण दहशतवादी नेटवर्कला उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय लष्कर आणि गुप्तचर यंत्रणा सध्या ठोस रणनीती आखत असल्याची माहिती आहे.
