कानाखेडा गावातील कुटुंब रात्री भिलवाडायेथील सवाई भोज येथून परत येत होतं, तेव्हा रस्ता चुकू नये म्हणून त्यांनी गुगल मॅपचा आधार घेतला. गुगल मॅपने दाखवलेल्या रस्त्यावरून ड्रायव्हर गाडी बनास नदीवरील सोमी-उप्रेंडा कल्व्हर्टवर घेऊन गेला, पण हा कल्व्हर्ट मागच्या 3 वर्षांपासून बंद होता आणि नदीचे पाणी त्यावरून वाहत होतं.
ड्रायव्हरने गाडी कल्व्हर्टवर आणताच, गाडी खड्ड्यात अडकली आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे नदीत पडली. व्हॅन पाण्यात जाताच प्रवाशांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला, तेव्हा गावकरी तिथे पोहोचले आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. यानंतर रश्मी पोलीस ठाण्याचं पोलीस पथक तिथे आलं आणि गावकऱ्यांनी बोटीने अडकलेल्यांना वाचवायला सुरूवात केली.
advertisement
रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना पाच जणांना सुरक्षित वाचवण्यात आले तर बेपत्ता झालेल्या चार जणांचा शोध घेण्यासाठी नागरी संरक्षण पथकाला पाचारण करण्यात आले आहे, पण रात्री उशीर झाल्यामुळे बचाव कार्य सुरू होऊ शकलं नाही.
वाहून गेलेले सर्व 9 जण हे गदारी समाजाचे होते. वाचवण्यात आलेल्यांमध्ये देवीलालचा मुलगा मदनलाल (वय 25), सोहनचा मुलगा हितेश (वय 16), देवीलालची पत्नी लीला (वय 18), मदतनचा मुलगा काव्यांश (9 महिने) आणि देवीलालचा मुलगा काव्यांश (9 महिने) यांचा समावेश आहे. तर हेमराजची पत्नी चंदा (वय 21), मदनची पत्नी ममता (वय 25), मदनची मुलगी खुशी (वय 4) आणि हेमराजची मुलगी रुत्वी (वय 6) यांचा शोध सुरू आहे.
मंगळवारी रात्री मातृकुंडिया धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे बनास नदीवरील पाण्याची पातळी वाढली, त्यामुळे पूलावरून पाणी ओसंडून वाहत होतं. सुरक्षेसाठी प्रशासनाने हा पूल बंद केला होता.
नवी मुंबईमध्येही अपघात
दुसरीकडे नवी मुंबईमध्येही गुगल मॅपमुळे महिलेच्या गाडीचा अपघात झाला आहे. ही महिला रात्री 1 वाजता बेलापूरहून उलवेकडे जात होती. रस्ता चुकू नये म्हणून तिने गुगल मॅप सुरू केला, पण तिची कार बेलापूरजवळच्या नाल्यात पडली. नेव्हिगेशनने महिलेला योग्य पूलावर नेण्याऐवजी ध्रुवतारा जेट्टीकडे जाणाऱ्या पुलाखालील मार्गावर नेले. नेव्हिगेशन योग्य मार्गाने नेत असल्याचं महिलेला वाटलं, पण गाडी अचानक नाल्यामध्ये गेली. स्थानिक मरीन सिक्युरिटी फोर्सच्या सदस्यांनी अपघात पाहिला आणि त्यांनी तातडीने मदत केली. सुदैवाने महिलेला कोणतीही दुखापत झाली नाही. क्रेनचा वापर करून बुडालेल्या गाडीला बाहेर काढण्यात आलं.
दरम्यान गुगलने मात्र मॅपने चुकीचे निर्देश दिल्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. आमच्या टीमने या घटनेची चौकशी केली आहे. पूलाखालचा रस्ता गुगल मॅप्समध्ये नेव्हिगेशनसाठी मॅप केलेला नाही तसंच गुगल मॅप त्यावरून जाण्याचा मार्ग सुचवत नाही, असं स्पष्टीकरण गुगलने दिलं आहे.