हेल्मेट न घालता चौघं एकाच बाईकवर बसून बाहेर पडले आणि समोरून येणाऱ्या कारसोबत जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात चारही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. रीलच्या नावाखालील हा बेजबाबदारपणा त्यांच्या जीवावर बेतला. या घटनेतील मृत्युमुखी तरुण अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली आहे. नवी कोरी विकत घेतलेली बाईक घेऊन ते इंस्टासाठी व्हिडीओ शूट करून परत घरी येत होते. रस्त्यावरील निष्काळजीपणा आणि हेल्मेटचा वापर न केल्यामुळे त्यांच्या आयुष्याला अकाली पूर्णविराम लागला. अपघातानंतर त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
advertisement
ही दुर्घटना उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील कुलेसरा पुस्ता रोडवर सोमवारी दुपारी घडली. सुमित (१६), लवकुश (१७), मोनू ठाकूर (१८) आणि रिहान (१८) अशी मृत तरुणांची ओळख पटली आहे. सर्व जण एका बाईकवरून प्रवास करत होते. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली.
अपघात एवढा भीषण होता की बाईक हवेत उडाली आणि चारही जण रस्त्यावर कोसळले. एका तरुणाला तर धक्क्यामुळे रस्त्याच्या कडेला खड्यात जावे लागले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून कारचालकाला अटक केली असून वाहन जप्त केले आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. या घटनेमुळे चार कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एक छोटी चूक जीवावर बेतू शकते. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून हे चार तरुण रील करायला गेले होते. असे नियम धाब्यावर बसवून जीवघेणे रील्स करु नयेत असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
