1997 मध्ये दिल्ली पोलिसातल्या एका एसीपीने कॅनॉट प्लेसमध्ये दोन व्यापाऱ्यांवर गोळीबार केला. ओळखीत चूक झाल्यामुळे गुंडाऐवजी भलतीच व्यक्ती मारली गेली. अशाच प्रकारची चूक गुरू तेग बहादूर रुग्णालयात अर्थात जीटीबीमध्ये झालेल्या गोळीबारात झाली. या वेळी ही चूक पोलिसांची नाही तर गुंडांची होती.
जीटीबीच्या ज्या वॉर्डमध्ये रियाजजुद्दिन (वय 32) नावाची व्यक्ती दाखल होती, त्याच वॉर्डात त्याच्या बेडसमोर गुंड वसीम दाखल होता. रियाजजुद्दिन हा श्रीराम कॉलनी (खजुरी खास) इथला रहिवासी होता. वडिलांच्या मृत्यूनंतर तो डिप्रेशनमध्ये गेला होता आणि तो व्यसनी झाला होता. त्यामुळे त्याच्या पोटात संसर्ग झाला होता. दोन महिन्यांपूर्वी त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर तो व्यसनमुक्ती केंद्रात दाखल होता. काही दिवसांपूर्वी त्याच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. कुटुंबीयांना याबाबत माहिती मिळताच 23 जून रोजी ते त्याला घेऊन जीटीबी रुग्णालयात गेले. रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरच्या वॉर्ड क्रमांक 24 मध्ये त्याला दाखल करण्यात आलं. त्याच्या कुटुंबात त्याची आई, पत्नी आणि दोन मुलं आहेत. रविवारी (14 जुलै) सायंकाळी चार वाजता तीन हल्लेखोर शस्त्रांसह अचानक वॉर्ड क्रमांक 24 मध्ये आले. त्यांनी रियाजजुद्दिनच्या पोटावर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. त्यामुळे आजूबाजूचे लोक घाबरले. त्या वेळी रियाजजुद्दिनजवळ त्याची बहीण तरन्नुम त्याची देखभाल करत होती. गोळ्या झाडल्यावर हल्लेखोर तिथून निघून गेले. या घटनेमुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली. रियाजजुद्दिनचा मृत्यू झाला होता. हल्लेखोरांनी सात राउंड झाडले होते. पोलिसांना घटनास्थळी पाच शेल सापडले. तपासात हल्लेखोरांच्या निशाण्यावर वसीम होता. तो समोरच्या बेडवर होता; पण हल्लेखोरांनी चुकून रियाजजुद्दिनवर गोळ्या झाडल्या.
advertisement
यात हल्लेखोरांकडून चूक कशी होऊ शकते, असा प्रश्न उपस्थित होतो. पोलिसांनी वासीमची चौकशी सुरू केली. वसीमला शास्त्री पार्क पोलीस स्टेशनने गुन्हेगार घोषित केलं आहे. तो 17 प्रकरणांत आरोपी आहे. वेलकम पोलीस स्टेशनच्या हद्दीतला गुंड समीर बाबाने हा हल्ला घडवल्याचा दावा वसीमच्या कुटुंबीयांनी केला. समीर बाबाने त्याचे गुंड रुग्णालयात पाठवले होते. तो वसीमची हत्या करू इच्छितो. यापूर्वी दोन वेळा त्याने हत्येचा प्रयत्न केला आहे.
वसीमची पत्नी आफरिनच्या म्हणण्यांनुसार, 'माझ्या पतीची हत्या करण्यासाठी यापूर्वी दोन वेळा हल्लेखोर आले होते. संधी न मिळाल्याने ते परत गेले. समीर हा दिल्लीतला गँगस्टर हाशिम बाबासाठी काम करतो. वसीम तुरुंगात असताना त्याचे वेलकम परिसरातल्या समीर बाबासोबत वाद झाले होते. समीरच्या इशाऱ्यावरून वसीमच्या हत्येची योजना आखली गेली. यापूर्वी झालेल्या हल्ल्यातून वसीम बचावला होता.'
12 जून रोजी वसीमला वेलकम पोलीस स्टेशन हद्दीतल्या शैतान चौकात बोलवण्यात आले. तिथं दोन हल्लेखोरांनी वसीम आणि त्याचा मित्र आसिफवर जीवघेणा हल्ला केला. त्या वेळी वसीमला चार, आसिफला तीन, तर फुटपाथवरच्या दोन वृद्ध व्यक्तींना प्रत्येकी एक गोळी लागली होती. या प्रकरणी पोलिसांनी फैजान, मोहसीन आणि जुनैदला अटक केली. तेव्हापासून वसीमवर जीटीबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिल्ली पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसीम हा गुंड असूनदेखील पोलिसांना त्याच्या सुरक्षेची विशेष चिंता नव्हती; पण आता घडलेल्या घटनेमुळे दिल्ली पोलिसांचं टेन्शन आणखी वाढलं आहे.
वाचा - भाच्याने कुटुंबासमोरच मामा-मामीला गोळ्या झाडून संपवलं; कारण ऐकून पोलीसही थक्क
वसीमविरुद्ध हत्येचा प्रयत्न, जबरदस्तीनं वसुली आणि लूटमारीचे 17 गुन्हे दाखल आहेत. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. गोळी झाडणारा मास्टरमाइंड अजून फरार आहे. या घटनेमुळे गँगवॉर अर्थात टोळीयुद्धाची शक्यता वाढेल. गँगस्टर हाशिम बाबा, नासीर आणि छेनू टोळीचे गुंड ईशान्य जिल्हा पोलिसांसाठी डोकेदुखी बनले आहेत. या प्रकरणात हत्येचा मास्टर माइंड फहीम उर्फ बादशाह खानचा शोध सुरू आहे. तो गँगस्टर हाशिम बाबा टोळीतला गुंड आहे. रुग्णालयात दाखल असलेला वसीम इरफान छेनू टोळीचा सदस्य आहे. हल्लेखोर हाशिम बाबा टोळीशी संबंधित आहे. या दोघांमध्ये वैर आहे. या वर्षाच्या सुरुवातीला गँगस्टर वसीमने मंडोली कारागृहात असलेल्या हाशिम बाबाला धमकी दिली होती. तसंच त्याच्या गुंडांवर हल्ल्याचा कट रचला होता. त्यानंतर या दोघांमध्ये वैर निर्माण झालं आहे.