पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॉलेजमध्ये शिकवणारी महिला शिक्षिका वैवाहिक वादामुळे तिच्या पतीपासून वेगळी राहत होती. महिलेने नीमपाडा भागामध्ये भाड्याचं घर घेतलं होतं. मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास महिलेचा पती त्याच्या सहकाऱ्यांना घेऊन तिच्या घरात घुसला. घरामध्ये महिला शिक्षिका तिच्या पुरुष मित्रासह होती. हे पाहून पतीने महिलेला बाहेर ओढलं आणि मारहाण करायला सुरूवात केली.
advertisement
मारहाण केल्यानंतर पतीने महिलेच्या गळ्यात चपलांचा हार घातला आणि तिला रस्त्यावरून चालायला भाग पाडलं. हे सगळं होत असताना रस्त्यावरची गर्दी महिलेसोबत होत असलेला प्रकार पाहत होती. महिलेचा पती एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तिच्या मित्राचे कपडे काढले आणि त्याला अंतर्वस्त्रांवर रस्त्यावर फिरवलं. ओडिशाच्या पुरीमध्ये घडलेल्या या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
रस्त्यावरचा हा गोंधळ पाहून स्थानिक पोलीस तिथे आले. अनेकांनी त्यांच्या फोनवर ही घटना रेकॉर्ड केली. याप्रकरणी पोलिसांनी महिलेचा पती आणि त्याच्या सहकाऱ्यांना अटक केली आहे. या सगळ्यांवर महिलेचा विनयभंग आणि हल्ला केल्याच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.