ज्या अधिकाऱ्यांनी फरीदाबादपर्यंत जाऊन 'व्हाईट-कॉलर' दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला, त्याच जप्त स्फोटकांनी त्यांचा घात केला. नऊ कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या संशयातून बाहेर येत अखेर पोलीस महासंचालकांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेमागील सत्य परिस्थिती सांगितली. ही केवळ एक तांत्रिक चूक नसून, दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात देशाला झालेली एक मोठी हानी आहे. या स्फोटात फॉरेन्सिक अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून 27 पोलीस जखमी आहेत. एकूण जखमींचा आकडा 32 वर गेला आहे. गाड्यांचं मोठं नुकसान झालं. स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला. या भीषण स्फोटामुळे परिसरात काहीवेळ तणावाचं वातावरण होतं.
advertisement
जम्मू-काश्मीरमध्ये नौगाम पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी रात्री झालेला भीषण स्फोट कोणत्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला किंवा कट नसून, तो केवळ एक दुर्दैवी अपघात होता, अशी महत्त्वपूर्ण माहिती डीजीपी (DGP) नलिन प्रभात यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. एफएसएल टीमकडून स्फोटक सामग्रीचे नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू असताना ही घटना घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. डीजीपी नलिन प्रभात यांनी सांगितले की, फरीदाबाद येथून जप्त करण्यात आलेल्या स्फोटक आणि रासायनिक सामग्रीच्या नमुने घेण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून नौगाम पोलीस स्टेशनमध्ये सुरू होती.
याच दरम्यान, रात्री ११:२० च्या सुमारास हा अपघात झाला. डीजीपी म्हणाले, "हा एक अत्यंत दुर्दैवी अपघात आहे आणि त्याची सविस्तर चौकशी केली जात आहे." गृह मंत्रालयानेही एक निवेदन जारी करून या घटनेची माहिती दिली असून, स्फोटाला केवळ एक अपघात म्हणून संबोधले आहे. डीजीपी यांनी स्पष्ट केले की, या घटनेत कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कारस्थानाचा किंवा बाह्य हस्तक्षेपाचा सहभाग नाही.
९ लोकांचा मृत्यू, ३२ जखमी
या भीषण अपघातात आतापर्यंत ९ लोकांचा मृत्यू झाला असून, ३२ लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये १ एसआयए (SIA) अधिकारी, ३ एफएसएल सदस्य, २ क्राइम विंग कर्मचारी, २ महसूल अधिकारी आणि टीमसोबत असलेला एक शिंपी (दर्जी) यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, २७ पोलीस कर्मचारी, २ महसूल अधिकारी आणि ३ नागरिक जखमी झाले आहेत. सध्या ढिगारे हटवण्याचे काम सुरू असल्याने मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
'काळजीपूर्वक काम सुरू असतानाही...'
डीजीपी नलिन प्रभात यांनी सांगितले की, फरीदाबादमधून जप्त केलेली मोठ्या प्रमाणातील स्फोटक सामग्री आणि रासायनिक द्रव्ये तपासणीसाठी नौगाम पोलीस ठाण्यात आणली होती. या सामग्रीचे संवेदनशील स्वरूप लक्षात घेऊन अत्यंत काळजीपूर्वक काम केले जात होते. मात्र, काल रात्री एक आकस्मिक स्फोट झाला. या स्फोटामुळे नौगाम पोलीस स्टेशनच्या इमारतीचेही मोठे नुकसान झाले आहे. डीजीपींनी जोर देऊन सांगितले की, हा पूर्णपणे अपघात आहे आणि इतर कोणत्याही प्रकारच्या अटकळी अनावश्यक आहेत.
स्फोटाच्या तीव्रतेमुळे संपूर्ण परिसरात हाहाकार माजला होता. दक्षिण श्रीनगरमध्ये अनेक किलोमीटर दूरपर्यंत स्फोटाचा आवाज ऐकू आला. स्फोट होताच पोलीस स्टेशनमधून आगीच्या मोठ्या ज्वाला उठू लागल्या. माहिती मिळताच रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी पोहोचल्या. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा रुग्णालयासह सर्व आरोग्य केंद्रांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
