पहिल्यांदाच घडलं 'असं' काही!
प्रजासत्ताक दिनाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या स्वतंत्र देशाच्या प्रमुखाऐवजी संपूर्ण युरोपियन युनियनच्या (EU) दोन सर्वोच्च नेत्यांना उर्सुला वॉन डर लेयन आणि अँटोनियो कोस्टा एकत्र निमंत्रित करण्यात आले. इतकंच नाही तर, यंदा कर्तव्य पथावर चक्क युरोपियन युनियनच्या लष्करी तुकडीने भारतीय जवानांसोबत संचलन केलं. हा भारताने युरोपला दिलेला 'सन्मान' आणि जगाला दाखवलेली 'मैत्री' होती. आतापर्यंत भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात स्वतंत्र देशाच्या प्रमुखांना आमंत्रित केले जात असे.
advertisement
अमेरिकेला दिलेला स्पष्ट संकेत
आज जेव्हा अमेरिका विविध मुद्द्यांवर भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे, अशा वेळी भारताने युरोपला केंद्रस्थानी आणलं. भारत कोणाच्याही एका गोटात अडकणार नसल्याचा स्पष्ट संदेश या कृतीतून देण्यात आला. भारत हा आपली 'स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी' (स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य) भारत कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, हेच यातून सिद्ध झालं.
'मदर ऑफ ऑल डील्स' कडे पाऊल
या भेटीचं सर्वात मोठं कारण पडद्यामागे लपलेलं आहे. India–EU Free Trade Agreement (FTA) हे एक महत्त्वाचं कारण आहे. युरोपियन नेत्यांनी या कराराला 'मदर ऑफ ऑल डील्स' म्हटलं आहे. हा करार झाल्यास भारतीय वस्तूंना युरोपची मोठी बाजारपेठ खुली होईल आणि चीनवरचं जगाचं अवलंबित्व कमी होईल. त्याशिवाय, भारतीय उद्योग, लघुद्योगांना मोठ बळ मिळेल.
युरोपला भारतच का हवाय?
युक्रेन युद्ध आणि ऊर्जेच्या संकटामुळे युरोप सध्या अडचणीत आहे. अशा वेळी त्यांना चीनपेक्षा 'लोकशाहीवादी भारत' हा अधिक विश्वासार्ह वाटत आहे. भारतासोबतची ही मैत्री युरोपसाठी आपली 'सप्लाय चेन' सुरक्षित करण्याची मोठी संधी आहे.
परेड नव्हे, हे होतं 'स्टेटक्राफ्ट'
कर्तव्य पथावर दिसलेली स्वदेशी शस्त्रे, 'ऑपरेशन सिंदूर'चा हेलिकॉप्टर शो आणि भारताचे सांस्कृतिक वैविध्य पाहून युरोपला भारताच्या वाढत्या ताकदीची जाणीव झाली आहे. हा सोहळा म्हणजे भारत आता स्वतःच्या अटींवर जगाशी व्यवहार करतोय, याचं जिवंत उदाहरण होतं.
जगात भारतच केंद्रस्थानी...
यंदाच्या प्रजासत्ताक दिनाने हे सिद्ध केलं की, भारत आता केवळ दक्षिण आशियातील शक्ती राहिलेला नाही, तर तो जगाचा 'विश्वबंधू' आणि एक मोठा 'डिप्लोमॅटिक खेळाडू' बनला आहे. त्यामुळे भारताला वगळून कोणतंही आंतरराष्ट्रीय राजकारण करता येणार नाही, हे समोर आलं आहे.
