सोमवारी सुप्रीम कोर्टात घडलेल्या या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली होती. सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतर एका ज्येष्ठ वकिलाने पायातील बूट काढून सरन्यायाधीश गवई यांच्या दिशेने भिरकाविण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायालयात उपस्थित सुरक्षारक्षकांनी तसेच पोलिसांनी तत्काळ आरोपीला ताब्यात घेतले. राकेश किशोर याला न्यायालयाच्या बाहेर नेत असताना सनातनचा अपमान सहन करणार नाही, अशी घोषणाबाजी केली. राकेश किशोर हे मागील अनेक वर्षांपासून वकिली करत आहेत.
advertisement
राकेश किशोरची मुजोरी कायम, जे कृत्य केलंय...
वृत्तसंस्थेशी बोलताना राकेश किशोर यांनी म्हटले की, परमात्म्याने माझ्याकडून जे करवून घेतले ते मी केले. मला या गोष्टीचे कोणतेही दु:ख नाही. मी कोणाचीही माफी मागणार नाही, असे राकेश किशोर याने म्हटले.
त्याने पुढे म्हटले की, सरन्यायाधीशांनी खजुराहो येथे विष्णूंची मूर्ती पुन्हा स्थापित करण्याविषयीची याचिका फेटाळून लावली. त्यावेळी त्यांनी म्हटले की, तुम्ही मूर्तीला प्रार्थना करा, मूर्तीलाच सांगा, स्वत:ची पुर्नबांधणी करा. जेव्हा न्यायालयात दुसऱ्या धर्माबाबतच्या याचिका येतात तेव्हा मोठे निर्णय घेतले जातात. पण जेव्हा सनातन धर्माबाबतची याचिका न्यायालयात येते तेव्हा न्यायालय त्याबाबत काहीतरी नकारात्मक निर्णय देते असा दावा त्याने केला.
राकेश किशोरने पुढे म्हटले की, मी हिंसेच्या विरोधात आहे. माझ्यावर आजपर्यंत एकही केस दाखल नाही. मीदेखील खूप शिक्षण घेतलेले आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे. मी नशेतही नव्हतो. मात्र, माझ्यासारख्या व्यक्तीने हे कृत्य का केले, याचा विचार करा. माझ्यावर कोणतीही कारवाई झाली तरीही त्यासाठी तयार असल्याचे राकेश किशोर याने म्हटले.