आव्हानांच्या चक्रव्युहात भारत, पण मार्ग सापडला!
सध्या हवाई दलाकडे लढाऊ विमानांच्या तुकड्यांची कमतरता आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे शस्त्रास्त्रांचा पुरवठा रेंगाळला असून अमेरिकेसोबतच्या टॅरिफ वादामुळे तिथूनही मदतीची अपेक्षा कमी आहे. दुसरीकडे चीन आपली ५ व्या पिढीची J-20 आणि J-35 ही विमाने पाकिस्तानला देऊन भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भारताची आगामी १० वर्षांची तयारी पाहता चीनचा हा फुगा लवकरच फुटणार आहे.
advertisement
१५० राफेल आणि ३ लाख कोटींचा व्यवहार
भारताकडे सध्या ३६ राफेल विमाने आहेत. मात्र, हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी आणखी ११४ राफेल विमानांचा व्यवहार अंतिम टप्प्यात आहे. हा व्यवहार सुमारे ३ लाख कोटी रुपयांचा असून पुढच्या काही महिन्यांत त्यावर स्वाक्षरी होईल. यातील सुरुवातीची काही विमाने थेट फ्रान्समधून येतील आणि बाकीची भारतात बनवली जातील. याव्यतिरिक्त भारतीय नौदलासाठीही २६ 'मरीन राफेल' खरेदी केले जाणार आहेत.
रशियाचे सुखोई-५७: चीनला चोख प्रत्युत्तर
चीन-पाकिस्तानच्या जुगलबंदीला टक्कर देण्यासाठी भारत रशियाकडून ६०, Sukhoi-57E ही ५ व्या पिढीची लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या तयारीत आहे. नुकत्याच समोर आलेल्या अहवालानुसार, रशियन तज्ज्ञ ही विमाने भारतात 'HAL' च्या मदतीने बनवण्याबाबतचा व्यवहार्यता अहवाल सादर करणार आहेत. भारताकडे आधीच सुखोई-३० चे इन्फ्रास्ट्रक्चर असल्याने ही विमाने भारतात बनवणे सोपे जाणार आहे.
१० युनिट्स S-400 आणि सुदर्शन चक्र
केवळ हल्लाच नाही, तर संरक्षणासाठीही भारताने कंबर कसली आहे. 'सुदर्शन चक्र' प्रोजेक्ट अंतर्गत भारत रशियाकडून एकूण १० S-400 डिफेन्स सिस्टम घेण्याच्या योजनेवर काम करत आहे. यापैकी ३ सिस्टिम भारताला मिळाल्या असून उरलेल्या ५ सिस्टिमसाठी नवा करार होऊ शकतो. यामुळे भारताचे आकाश शत्रूसाठी 'नो फ्लाय झोन' बनेल.
स्वदेशी शक्ती: २१० तेजस आणि ४० AMCA
तेजस मार्क-१ए आणि २: हवाई दल ९७ अधिक तेजस विमानांची ऑर्डर देणार आहे. तसेच यावर्षी 'तेजस मार्क-२' चे प्रोटोटाइप उड्डाण करेल, जे राफेलच्या तोडीचे असेल. २०३० पर्यंत असे २१० हून अधिक तेजस ताफ्यात असतील.
AMCA प्रोजेक्ट: भारताचे स्वतःचे ५ व्या पिढीचे विमान 'एम्का' २०२५ पर्यंत प्रोटोटाइप स्टेजवर असेल आणि २०३५ पर्यंत हवाई दलात सामील होईल. विशेष म्हणजे, यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) वापर केल्यामुळे हे ५.५ पिढीचे विमान असेल, जे चीनच्या जे-३५ पेक्षा कितीतरी पटीने प्रगत असेल.
पुढील दशकात भारतीय हवाई दलाकडे १५० राफेल, ६० सुखोई-५७, २१० तेजस आणि ४० एम्का असा बलाढ्य ताफा असेल. जेव्हा हे सर्व प्रकल्प पूर्ण होतील, तेव्हा चीन किंवा पाकिस्तानच काय, तर जगातील कोणत्याही महासत्तेला भारताच्या सीमेकडे पाहण्याची हिंमत होणार नाही.
