अरुण कुमार वर्मा मूळचा उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यातील. पण शहाजहानपूरमध्ये सुपरवाइझर म्हणून काम करतो आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरतो. पण सिलेंडरची टंचाई निर्माण झाली आणि त्याच्यावर मोठं संकट कोसळलं. तसा सिलेंडर टंचाईच्या समस्येचा सामना अनेकांना करावा लागला
अरुण कुमारच्या आईला ब्रेन हॅमरेज, ती अंथरूणाला खिळली आहे. वडिलांना कॅन्सर, तेसुद्धा गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. आपल्या आजारी आईवडिलांना सांभाळ, त्यांच्या उपचाराचा खर्च. त्यात दोन मुली असल्याने त्याच्या कुटुंबाच्या पालनपोषण, अशी सगळी जबाबदारी अरुणच्या खांद्यावर आहे. घरापासून दूर राहून तो ही जबाबदारी कशीबशी पेलतो आहे.
advertisement
हे कमी की काय त्यात ऐन गॅस टंचाईत अरुणच्या घरचा सिलेंडर संपला. त्याने सिलेंडर बुक केला पण कित्येक दिवस आलाच नाही. इतर लोकांप्रमाणे अरुणचं कुटुंबही तोपर्यंत चुलीकडे वळलं. घरी चुलीवर स्वयंपाक होत होता. पण त्याचा धूर त्याच्या आईवडिलांसाठी धोकादायक ठरू शकत होता. शेवटी अरुणने आपलं काम बाजूला ठेवलं. एक दिवसाची सुट्टी घेऊन तो शहाजहानपूरहून तो 200 किमी दूर बाराबंकीला त्याच्या तेंडोला गावात आला.
रात्रीचे दोन वाजले होते. अरुण तसाच घराबाहेर पडला आणि धावत गॅस एजन्सी ऑफिसकडे निघाला. घरापासून 8 किमी दूर गॅस एजन्सीला तो मध्यरात्री पायपीट करत आला. एजन्सी ऑफिस सकाळी 10 वाजता उघडतं. पण रांगा लागून त्यात आपल्याला सिलेंडर मिळायला उशीर होऊ नये, एक दिवसाची सुट्टी घेतली आहे, पुन्हा कामावर जायचं आहे म्हणून.
अरुणचा मध्यरात्री घेण्यात आलेला हा व्हिडीओ अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सिलेंडरसाठी अरुण रात्रभर रांगेत आहे. जोपर्यंत आपल्याला सिलेंडर मिळत नाही तोपर्यंत आपण इथून जाणार नाही, इथंच राहणार, सिलेंडर घेऊन जाणार, असं अरुण या व्हिडीओ सांगतो.
आर्थिक अडचणींमध्ये कुटुंबाच्या वैद्यकीय आणि दैनंदिन गरजा भागवण्याचं आव्हान असताना गॅस टंचाईमुळे आणखी एक आव्हान आलं आहे. त्याच्या आयुष्यात एकामागोमाग एक आव्हाने येऊन पडली आहेत. अरुणसारखीच सिलेंडरसाठी रांगेत उभी असलेली कित्येक माणसं असतील. जे व्यवस्थेसाठी फक्त आकडे असतील, पण त्यांच्या कुटुंबीयांसाठी ते सर्वस्व आहेत.
