नेपाळमधील सामान्य जनता आधीच ओली सरकार, मंत्री आणि नेत्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल असंतोष आणि संतापाने भरलेली होती. सोशल मीडियावरील बंदीमुळे त्याला आणखी बळकटी मिळाली. झेन-झीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले.
या हिंसाचारामुळे नेपाळचं लष्कर आता रस्त्यावर उतरले असून संचारबंदी देखील लागू झाली आहे. मोठ्या संख्येने परदेशी पर्यटकही सापडले आहेत. यामध्ये भारतीय पर्यटकांचाही समावेश आहे. राजधानी काठमांडूमध्ये हिंसाचाराच्या विळख्यात अडकलेल्या एका भारतीय महिला पर्यटकाने सरकारला आपला जीव वाचवण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
व्हिडीओमध्ये काय म्हटले?
या महिलेचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तिने म्हटले की, आंदोलकांनी केलेल्या हिंसाचारामध्ये ते वास्तव्य करत असलेल्या हॉटेल जाळण्यात आले. जमाव काठ्या घेऊन तिच्या मागे धावला. मात्र, या जीवघेण्या प्रसंगातून कसाबसा जीव वाचवला असल्याचे तिने सांगितले. या महिलेने भारतीय दूतावास आणि सरकारकडे मदत करण्याची मागणी केली.
उपासिता काळे असे या महिलेचे नाव असून तिने आपल्या व्हिडीओ घडलेल्या प्रसंगाबाबतची माहिती दिली. उपासिता काळे म्हणाली की ती नेपाळ व्हॉलीबॉल लीगसाठी पोखरा येथे आली होती. परंतु निदर्शनांदरम्यान तिचे हॉटेल जळून खाक झाले आणि तिचे सर्व सामान बेचिराख झाले. उपासिताने म्हटले की, मी ज्या हॉटेलमध्ये राहत होते ते पूर्णपणे जळून खाक झाले आहे. माझे सर्व सामान रुममध्ये आत होते. मी स्पामध्ये असताना, जमाव लाठ्याकाठ्या घेऊन माझ्या मागे धावत होते. मी कसा तरी माझा जीव वाचवण्यात यशस्वी झाले.परिस्थिती खूप वाईट आहे, पर्यटकांनाही सोडले जात नाहीये, असे तिने व्हिडीओमध्ये म्हटले.
नेपाळमधील विद्यार्थी आणि तरुणांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले हे आंदोलन सोशल मीडियावरील बंदीविरुद्ध होते. मात्र, या आंदोलनाने भ्रष्टाचार आणि सरकारविरुद्धच्या संतापाच्या मुद्यावर अधिकच तीव्र झाले. निदर्शकांनी संसद भवन, अनेक सरकारी इमारती आणि नेत्यांच्या घरांना आग लावली. गेल्या दोन दिवसांत झालेल्या हिंसाचारात 20 हून अधिक आंदोलकांचा मृत्यू झाला आहे.