नेमकी घटना काय?
बुधवारी दुपारी केपी कॉलेजच्या परिसरात नेहमीप्रमाणे वर्दळ होती. अचानक आकाशात रॉकेटसारखा मोठा आवाज झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विमान हवेतच नियंत्रणाबाहेर गेले आणि वेगाने खाली येऊ लागले. वैमानिकांनी लोकवस्ती वाचवण्यासाठी विमानाला तलावाच्या दिशेने वळवले आणि काही क्षणांतच विमान चिखल असलेल्या एका तलावात जाऊन आदळले. उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात बुधवारी दुपारी लष्कराच्या एका ट्रेनिंग एअरक्राफ्टला भीषण अपघात झाला. केपी कॉलेजच्या मागे असलेल्या एका तलावात हे विमान कोसळले.
advertisement
स्थानिक बनले देवदूत
विमान कोसळताच आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. प्रत्यक्षदर्शी पदम सिंह यांनी सांगितले की, "विमान पडल्याचा आवाज येताच आम्ही तलावाच्या दिशेने धावलो. तिथे काही लोक दलदलीत अडकले होते आणि मदतीसाठी ओरडत होते. आम्ही कशाचीही पर्वा न करता पाण्यात उड्या घेतल्या आणि दोन शिकाऊ पायलट्ससह ३ जणांना सुखरूप बाहेर काढले."
पॅराशूट उघडले अन् जीव वाचला
विमान कोसळण्यापूर्वीच पायलट्सनी पॅराशूटच्या सहाय्याने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला होता. स्थानिक रहिवाशांनी तातडीने 'डायल ११२' वर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. दोन्ही वैमानिकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
तपासाचे आदेश
हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की अन्य काही कारणामुळे, याचा तपास केला जाणार आहे. गजबजलेल्या शहराच्या मध्यभागी हा अपघात होऊनही पायलट्सनी दाखवलेल्या कौशल्यामुळे आणि स्थानिकांच्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला आहे. सध्या घटनास्थळी मोठी गर्दी जमली असून पोलीस परिस्थितीवर नियंत्रण मिळवत आहेत.
