पहलगाम हल्ला, केंद्र सरकारने राबविलेले ऑपरेशन सिंदूर, आणि शस्त्रसंधीची घोषणा करताना अमिरेकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी यावर झालेल्या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत उत्तर दिले. सैन्यदलाने राबवविलेले ऑपरेशन सिंदूरबाबतची सगळी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. संसदेत केलेल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ले चढवले.
अमेरिकेचे चार फोन , मी बैठकीत व्यग्र होतो, नंतर फोन केला तर...
advertisement
नरेंद्र मोदी म्हणाले, भारताची आक्रमक कारवाई सुरू असताना ९ मे रोजी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांचा मला फोन आला. परंतु माझी सैन्यदलासोबत बैठक सुरू होती. त्यामुळे मी फोन घेऊ शकलो नाही. बैठक आटोपल्यानंतर चार कॉल पाहून मी त्यांना पुन्हा फोन केला. तुमच्याप्रमाणेच पाकिस्तानने देखील आक्रमक उत्तर देण्याचा संकल्प बोलून दाखवला आहे, असे अमेरिकेच्या उपराष्ट्रध्यक्षांनी मला सांगितले. त्यावर मी त्यांना म्हणालो, त्यांच्या गोळीचे उत्तर आम्ही बॉम्बने देऊ. त्यांना हे सगळे प्रकरण अतिशय महागात पडेल.
...त्यानंतर आम्ही युद्धबंदीची घोषणा केली!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २९ वेळा भारत पाकिस्तानदरम्यान सुरू असलेले युद्ध थांबवल्याचे सांगितले. नरेंद्र मोदी यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी डोनाल़्ड ट्रम्प खोटे बोलत आहेत, हे देशाला संसदेच्या माध्यमातून सांगावे, असे आव्हान विरोधी पक्षनेते राहुल गांधी दिले होते. त्यावर बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, पाकिस्तानच्या डीजीएमओकडून फोन आला की आमच्यात आता सहन करण्याची शक्ती राहिली नाही. आमची खूप हानी झाली आहे. आता कृपया आपण हल्ले थांबवावेत. त्यानंतर आम्ही युद्धबंदीची घोषणा केली, असे सांगतानाच जगातल्या कोणत्याच नेत्यामुळे आम्ही युद्धविराम केला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना चॅलेंज दिले होते
भारत पाकिस्तान लष्करी संघर्षाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विराम दिल्याचे ते स्वत: सांगतात. आतापर्यंत तब्बल २९ वेळा त्यांनी मीच भारत पाकिस्तान यांच्यात युद्धविराम केला, असे सांगितले. जर हे खोटे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत सांगावे. जर त्यांच्यात इंदिरा गांधी यांच्यासारखे धाडस असेल तर ट्रम्प खोटारडे आहेत, हे त्यांनी देशाला सांगावे, असे उघड आव्हान लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिले होते.
