कर्नाटकातील तुमकूर येथील एका नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये नुकताच असाच एक अजब आणि तितकाच धक्कादायक प्रकार घडला आहे. एका प्रोफेसरने आपल्याच विद्यार्थिनीला सर्वांसमोर प्रपोज केलं, पण त्यानंतर जे काही घडलं, त्याने संपूर्ण कॅम्पस हादरून गेला.
नेमकं प्रकरण काय?
तुमकूरमधील श्री सिद्धार्था इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल कॉलेजमध्ये (SSIMC) हा प्रकार घडला. अब्दुल नावाच्या असिस्टंट प्रोफेसरने लेक्चर सुरू असतानाच एका विद्यार्थिनीला प्रपोज करण्याचं ठरवलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो प्रोफेसर असं म्हणताना ऐकू येतोय की, "या बॅचकडून मला जे प्रेम मिळालं, ते मी रोखू शकलो नाही. आज मी तुमच्या बॅचमधील एका सर्वात महत्त्वाच्या मुलीला प्रपोज करणार आहे आणि सर्वांना चॉकलेट्स वाटणार आहे." इतकंच बोलून त्याने त्या मुलीला सर्वांसमोर 'I Love You' म्हटलं.
advertisement
विद्यार्थिनीचा सडेतोड जाब आणि प्रोफेसरचा दावा
प्रोफेसर पोडियमवरून खाली उतरताच, त्या विद्यार्थिनीने त्याला रोखलं आणि थेट प्रिन्सिपलशी बोलायला सांगितलं. यावेळी प्रोफेसरने एक विचित्र दावा केला. तो म्हणाला, "तूच मला आधी प्रपोज केलं होतं आणि माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सगळं आहे."
जेव्हा विद्यार्थिनीने पुरावे दाखवण्यास सांगितलं, तेव्हा प्रोफेसरने "मी उद्या तुझ्याशी बोलेन" असं म्हणत विषय टाळला आणि विद्यार्थ्यांना चॉकलेट्स खाण्यास सांगून वर्गाबाहेर पडला.
या घटनेची बातमी वाऱ्यासारखी कॉलेजभर पसरली आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. संतप्त विद्यार्थ्यांनी प्रोफेसरला कॅम्पसमध्ये घेरलं. व्हायरल झालेल्या दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये, ती विद्यार्थिनी प्रोफेसरला चपलेने मारहाण करताना दिसत आहे. इतकंच नाही, तर इतर विद्यार्थ्यांनीही त्याला बेदम चोप दिला. प्रोफेसरने आपल्या कारजवळ जाण्याचा प्रयत्न केला, पण तिथेही त्याला गाठून मारहाण करण्यात आली. अखेर जखमी अवस्थेत तो तिथून पळ काढण्यात यशस्वी झाला.
कॉलेज प्रशासनाची मोठी कारवाई
हे कॉलेज कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांच्या मालकीचं आहे. या घटनेची गंभीर दखल घेत कॉलेज प्रशासनाने तातडीने प्रोफेसरला निलंबित केलं आहे. तसेच, या प्रकरणी पोलिसात FIR दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नातं हे पवित्र मानलं जातं. पण जेव्हा या नात्यातील मर्यादा ओलांडल्या जातात, तेव्हा असे संतापजनक प्रकार घडतात. या घटनेने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडवून दिली असून, शिक्षकांच्या वर्तणुकीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
