पहलगाम हल्ला, केंद्र सरकारने राबविलेले ऑपरेशन सिंदूर, आणि शस्त्रसंधीची घोषणा करताना अमिरेकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी यावर संसदेत वादळी चर्चा सुरू आहे. या चर्चेत मंगळवारी राहुल गांधी यांनी सहभाग नोंदवला. आपल्या भाषणात त्यांनी केंद्र सरकारवर तुफानी हल्ले चढवले.
इंदिरा गांधी यांच्यासारखी मोकळीक सैनिकांना द्यावी लागते
राहुल गांधी म्हणाले, पहलगाम हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबियांना मी भेटलो. त्यांच्या वेदना समजावून घेतल्या. महिलांच्या डोळ्यादेखत त्यांच्या पतीला गोळ्या घालण्यात आल्या. युद्धात राजकीय इच्छाशक्ती असायला लागते आणि सैनिकांना स्वातंत्र्य द्यावे लागते. लष्करी अधिकारी हे वाघासारखे असतात पण त्यांना मोकळीक द्यावी लागते. इंदिरा गांधी यांनी १९७१ साली सैनिकांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिले आणि बांगलादेशची निर्मिती केली.
advertisement
भारत सरकारने 'ऑपरेशन सिंदूर'वेळी सैन्यदलाचे हात बांधले
ऑपरेशन सिंदूर २२ मिनिटे चालले, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशाला सांगितले. १ वाजून ४५ मिनिटांनी पाकिस्तानला फोन करून लष्करी तळांवर हल्ला करणार नाही, असे भारत सरकारने का सांगितले? असे सांगून तुम्ही आपल्या पायलटचे, वायू सेनेचे हात बांधले. आम्हाला प्रकरण वाढवायचे नाही असे का सांगितले? मोदी सरकारने पाकिस्तानसमोर ३० मिनिटांत सरेंडर केले, असा जोरदार हल्ला राहुल गांधी यांनी चढवला.
चुकीच्या रणनीतीमुळे आपली विमाने पडले
भारताचे जेट कसे पडले असे विचारीत सरकारच्या चुकीच्या रणनीतीमुळे आपली विमाने पडली, असेही राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी सैन्यदल प्रमुखांच्या वक्तव्याचा दाखला दिला.
असीम मुनीर ट्रम्प यांच्यासोबत भोजनाला बसतो हे मोदींच्या परराष्ट्र धोरणाचं अपयश
ट्रम्प सांगतायेत की मी युद्धविराम केला. तुमच्यात इंदिरा गांधी यांच्यासारखे धाडस असेल तर ट्रम्प खोटारडे आहेत, पंतप्रधानांनी देशाला उद्देशून सांगावं. ५० टक्केही तुमच्यात धैर्य असेल तर तुम्ही बोलाल. पहलगाम हल्ल्यानंतर एकाही देशाने पाकिस्तानचा निषेध केला नाही, हे मोदींच्या परराष्ट्र धोरणाचं अपयश नाही का? असीम मुनीर ट्रम्प यांच्यासोबत भोजनाला बसतो हे परराष्ट्र धोरणाचं अपयश नाही का? ट्रम्प यांनी मुनीरला आमंत्रित केले होते, आपले परराष्ट्रमंत्री दुसऱ्या ग्रहावर बसतात का? असे एकामागून एक हल्ले राहुल गांधी सरकारवर चढवले.