मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित केला मुद्दा
काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नियम १७६ अन्वये या विषयावर चर्चेची मागणी केली. "पश्चिम आशियातील बदलत्या भौगोलिक-राजकीय (Geopolitical) परिस्थितीमुळे भारताच्या 'ऊर्जा सुरक्षे'समोर (Energy Security) मोठी आव्हाने उभी ठाकली आहेत, यावर तातडीने चर्चा व्हावी," असे खरगे यांनी नमूद केले.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत काय सांगितलं?
advertisement
विरोधकांच्या गदारोळात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सरकारची बाजू मांडली. त्यांनी सांगितले की, "मिडल ईस्टमध्ये सध्या प्रचंड तणाव आहे, मात्र तिथल्या प्रत्येक भारतीयाची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. भारतीयांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आर्मेनियाचा मार्ग (Armenia Route) वापरला जात आहे. या भागातील भारतीय दूतावास सातत्याने नागरिकांच्या संपर्कात असून त्यांना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे."
'संयम आणि संवाद' हाच मार्ग
जयशंकर यांनी स्पष्ट केले की, भारत सरकारने २० फेब्रुवारीलाच या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली होती. "सध्याच्या परिस्थितीत इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाशी संपर्क साधणे कठीण असले तरी, मी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली आहे. तणाव कमी करण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरी (Diplomacy) हाच एकमेव मार्ग असल्याचे भारताचे मत आहे," असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींचे बारीक लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी या संपूर्ण घडामोडींवर वैयक्तिकरीत्या लक्ष ठेवून आहेत. संबंधित सर्व मंत्रालयांमध्ये समन्वय असून कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारत सज्ज आहे. "मिडल ईस्टची स्थिरता भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण आपण या क्षेत्राचे शेजारी आहोत आणि तिथल्या संघर्षाचा थेट परिणाम भारतावर होतो," असेही जयशंकर यांनी नमूद केले.
जानेवारीतच भारतीयांना केलं होतं अलर्ट
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितलं की, भारतीय दूतावास नागरिकांच्या संपर्कात आहे. आम्ही जानेवारीमध्ये देखील अलर्ट जारी केला होता. लोकांना इराण सोडण्यासाठी वेळेवर सूचना देण्यात आल्या. दूतावास सतत लोकांच्या संपर्कात आहे. आम्ही आमच्या नागरिकांना वेळेवर सूचना दिल्या होत्या. कालपर्यंत आपल्या सुमारे ६७००० भारतीयांनी परतण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली आहे, पश्चिम आशियातील आपल्या लोकांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
