मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बिहार राज्यातील मुझफ्फरपूर जिल्ह्याच्या औरई गावात गावात घडलं. इथं एका विधवा सुनेनं सामाजिक परंपरा मोडून आपल्या सासऱ्यावर अंत्यसंस्कार केले. रामबाबू सिंग असं मयत ६५ वर्षीय सासऱ्याचं नाव आहे. दीर्घ आजाराने त्यांचं निधन झालं. त्यांचे अंतिम संस्कार गावातील स्मशानभूमीत करण्यात आले, जिथे त्यांची धाकटी सून पूजा देवी यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
advertisement
धाकटी सुनेचा पती रेल्वे अपघातात मरण पावला
पूजाचा पती इंद्रजीत कुमार यांचे २०२१ मध्ये रेल्वे अपघातात निधन झाले. तेव्हापासून पूजा तिच्या चार मुलींसह सासरच्या घरी राहत होती. इंद्रजीतच्या मृत्यूनंतर पूजा आणि तिच्या मुलींचा सांभाळ सासरे रामबाबू सिंग यांनीच केला होता. याच काळात रामबाबूचा मोठा मुलगा अरुण कुमारचा अनेकदा आपल्या वडिलांसोबत वाद झाला होता. या वादातून बापलेकामधील संबंध बिघडले होते. जे वडिलांच्या मृत्यूनंतरही बदलले नाहीत.
मोठ्या मुलाने वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यास दिला नकार
कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा रामबाबू सिंह यांचे निधन झाले. तेव्हा अरुण कुमारने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास स्पष्ट नकार दिला. लहान मुलाचं आधीच निधन झाल्यानं रामबाबू यांच्यावर अंत्यसंस्कार कोण करणार, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला होता. यावेळी विधवा असेलल्या पूजा देवी यांनी सामाजिक परंपरांची पर्वा न करता सासऱ्यांवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. पूजा देवी २८ वर्षांच्या आहेत. त्यांनी १० वर्षांपूर्वी इंद्रजीतशी लग्न केले होते.