आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत आहे. नोकरदार करदात्यांपासून ते महिला आणि वृद्धांपर्यंत सर्वांनाच अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पातून मध्यमवर्गाला मोठा दिलासा मिळू शकतो अशीही शक्यता आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य नागरिकांना, करदात्यांना काय दिलासा मिळणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.
लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी बाकांवरून सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू झाली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अर्थसंकल्प सादर करण्याची सूचना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना केली. त्याच दरम्यान विरोधी बाकांवरून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहता लोकसभा अध्यक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान बोलण्यास वेळ दिला जाईल, असे सांगितले. त्यानंतरही सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू होती. केंद्र सरकार हिंदूविरोधी असल्याची घोषणाबाजी विरोधकांच्या बाकांवरून सुरू झाली.
advertisement
गदारोळात अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात...
विरोधकांच्या गदारोळातच निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषण सुरू केले. काही वेळेनंतर विरोधकांनी घोषणाबाजी थांबवली. विरोधकांनी सभात्याग केला आणि काही वेळेनंतर पुन्हा सभागृहात दाखल झाले. निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सुरुवातीलाच कृषी क्षेत्रासाठीच्या तरतुदींचा उल्लेख केला. अर्थसंकल्पात कर सुधारणांवर भर असणार असल्याचे त्यांनी सुरुवातीला सांगितले. बजेटचे अंतिम स्थानक हे विकसित भारत आहे. एमएसएमई आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्यावर भर देणार असून अर्थसंकल्पात वीज क्षेत्र आणि खाणकामावर लक्ष केंद्रित केले जाईल असेही त्यांनी आपल्या भाषणात म्हटले.
