मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्यात अंतर्गत संघर्ष सुरू आहे, हे आता कोणापासूनही लपलेले नाही. अभिषेक बॅनर्जी यांचे सर्वात विश्वासू आणि जवळचे नेते म्हणून शंतनू सेन यांना ओळखलं जातं. त्यांनाच बाहेरचा रस्ता दाखवल्याने टीमएससीमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू असल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं आहे. गेल्या काही दिवसांत दोन्ही गटातील नेत्यांचे मतभेद उघड झाले होते. अशा परिस्थितीत, सेन यांना पक्षातून काढून टाकून, ममतांनी पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांना स्पष्ट संदेश दिला आहे, की पक्षात फक्त त्याच बॉस आहेत.
advertisement
ममता बॅनर्जी यांचा आक्रमक पवित्रा पाहता, पक्षातील शिस्तीबाबत त्या किती गंभीर आहेत, हे स्पष्ट होते. अशा परिस्थितीत अभिषेक बॅनर्जी गटातील नेत्यांना आता अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. पक्षाविरोधी कारवाया करण्याचा प्रयत्न केला, तर इतर काही जणांची देखील हकालपट्टी होऊ शकते.
खरं तर, आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या तपासाबद्दल सेन यांनी पोलिसांवर टीका केली होती. पत्रकारांशी बोलताना सेन म्हणाले की, त्यांच्या निलंबनाबद्दल पक्षाकडून अद्याप कोणताही संदेश मिळालेला नाही. मला निलंबनाचे कारण खरोखर माहीत नाही. मला पक्षाकडून अद्याप याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. निलंबनाचे कोणतेही वैध कारण मला सापडले नाही. मी पक्षाचा एक निष्ठावंत सैनिक आहे. मी इतरांसारखा पक्ष बदलणारा नाही आणि जेव्हा इतर पक्ष सोडून पळून जात होते, तेव्हा मी कठीण काळात पक्षाच्या पाठीशी उभा राहिलो आहे.
मागील वर्षी ऑगस्टमध्ये, आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे तत्कालीन प्राचार्य संदीप घोष यांच्या कारभाराविरोधात आवाज उठवल्याबद्दल सेन यांना पक्षाच्या प्रवक्त्या पदावरून काढून टाकण्यात आलं होतं. दुसरीकडे, कोलकात्याच्या बाह्य भागातील भांगोर येथील रहिवासी असलेले इस्लाम यांचे अनेकदा पक्षाचे आमदार सौकत मुल्ला यांच्याशी मतभेद राहिले आहेत. दोघांमधील वाद अनेकदा पक्ष नेतृत्वासाठी डोकेदुखी ठरत होता. यामुळेच माजी आमदार अराबुल इस्लाम यांचं निलंबन केल्याची माहिती आहे.