पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेचे नाव लक्ष्मी माधुरी असून तिने आपल्या पती लोकम शिवा नागराजू याची अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हत्या केली. नागराजू हा कांद्याचा व्यापारी होता. या संपूर्ण घटनेनंतर माधुरीने संपूर्ण रात्र आपल्या पतीच्या मृतदेहाजवळ बसून अश्लील व्हिडीओ पाहिल्याची माहितीही समोर आली आहे.
पोलीस तपासात उघड झाले आहे की, माधुरीने ही हत्या आपल्या प्रियकर गोपी याच्यासोबत मिळून आखली होती. घटनेच्या दिवशी तिने पतीसाठी बिर्याणी बनवली होती, ज्यामध्ये झोप येईल असे द्रव्य मिसळण्यात आले होते. ती बिर्याणी खाल्ल्यानंतर नागराजू गाढ झोपेत गेला.
advertisement
पती झोपल्यानंतर रात्री सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास माधुरीचा प्रियकर गोपी तिच्या घरी आला. यानंतर कटानुसार गोपी नागराजूच्या छातीवर बसला, तर माधुरीने उशीने त्याचा श्वास रोखला. या प्रकारामुळे नागराजूचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर गोपी घरातून निघून गेला, तर माधुरी आपल्या पतीच्या मृतदेहाजवळच बसून राहिली.
पुढील दिवशी सकाळी माधुरीने शेजाऱ्यांकडे जाऊन पतीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा केला. मात्र पती-पत्नीमध्ये वारंवार होणारे वाद आणि माधुरीचे कथित विवाहबाह्य संबंध यांची माहिती शेजाऱ्यांना असल्याने त्यांना संशय आला. तसेच मृतदेहावर दिसणाऱ्या जखमा पाहून त्यांनी नागराजूच्या कुटुंबीयांना माहिती दिली आणि पोलिसांना बोलावले.
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालात नागराजूचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्याच्या छातीच्या हाडांना फ्रॅक्चर झाल्याचेही आढळून आले. ज्यामुळे शारीरिक अत्याचार झाल्याच्या संशयाला दुजोरा मिळाला.
पोलिसांच्या चौकशीत लक्ष्मी माधुरीने गुन्ह्याची कबुली दिली. तिने पतीची हत्या केल्यानंतर संपूर्ण रात्र अश्लील व्हिडीओ पाहत बसल्याचेही मान्य केले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, हत्येमागील सर्व परिस्थिती आणि इतर बाबींचा सखोल तपास सध्या सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
