अंगणवाडी पर्यवेक्षक असणारी मुकेश कुमारी तिच्या पतीपासून 10 वर्षांपूर्वी वेगळी झाली. यानंतर ऑक्टोबरमध्ये ती मनाराम याच्याशी फेसबुकच्या माध्यमातून संपर्कात आली. मोबाईलवर बोलणं झाल्यानंतर दोघंही एकमेकांना भेटू लागले आणि त्यांच्यात प्रेम सुरू झालं. झुंझुनूची रहिवासी असलेली मुकेश कुमारी मनारामला भेटण्यासाठी अनेकदा 600 किमी गाडी चालवून बारमेरला जायची.
लग्नावरून दोघांमध्ये वारंवार भांडणं
advertisement
मुकेश कुमारीचा घटस्फोट झालेला होता, पण मनारामच्या घटस्फोटाचा खटला न्यायालयात प्रलंबित होता. मुकेश कुमारी मनारामवर लग्न करण्यासाठी दबाव आणत होती, त्यामुळे दोघांमध्ये वारंवार भांडणं होत होती.
10 सप्टेंबर रोजी मुकेश कुमारी झुंझुनूहून बाडमेरला मनारामच्या गावात तिची अल्टो कार घेऊन आली. गावातल्या लोकांना तिने मनारामच्या घराचा पत्ता विचारला आणि ती मनारामच्या घरी पोहोचली. मुकेश कुमारीने मनारामच्या कुटुंबाला त्या दोघांमधल्या नात्याबद्दल सांगितले, त्यामुळे मनाराम संतापला आणि त्याने पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दोघांचंही समुपदेशन केलं आणि समस्या सोडवायला सांगितलं.
पोलिसांनी समजावल्यानंतर मनारामने मुकेश कुमारीसोबत बोलण्याचं आश्वासन दिलं. यानंतर संध्याकाळी दोघेही बोलण्यासाठी भेटले, तेव्हा मनारामने मुकेश कुमारीच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला, यात तिचा मृत्यू झाला. मुकेश कुमारीची हत्या करून मनारामने तिचा मृतदेह गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर ठेवला आणि अपघात असल्याचं भासवलं.
पोलिसांनी मुकेश कुमारीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागृहात ठेवला आहे, कारण पोलीस मुकेश कुमारीच्या कुटुंबाची बारमेरला येण्याची वाट पाहत आहेत. हत्येची माहिती मिळताच फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉड घटनास्थळी दाखल झाला आणि त्यांनी तपासाला सुरूवात केली. पोलीस सध्या अटकेत असलेल्या मनारामची चौकशी करत आहेत.