बेंगळुरूतील प्रेमानंद नावाच्या व्यक्तीने Amazon वरून तब्बल ₹1.86 लाखांचा Samsung Galaxy Fold 7 मोबाईल ऑर्डर केला होता. डिलिव्हरी वेळेवर मिळालीही, पण जेव्हा त्यांनी बॉक्स उघडला तेव्हा आत मोबाईलऐवजी एक मार्बलची टाईल निघाली. कल्पना करा, इतक्या मोठ्या रकमेत मोबाईल मागवला आणि मिळाली एक टाईल. अशावेळी त्या व्यक्तीची काय अवस्था झाली असेल....
advertisement
मात्र प्रेमानंद यांनी एक शहाणपणाचा निर्णय घेतला होता त्यांनी संपूर्ण बॉक्स ओपनिंगचा व्हिडिओ शूट केला होता. त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की पार्सल अगदी व्यवस्थित Amazonच्या पॅकिंगसह आलेले होते. बाहेरून Galaxy Fold 7 चं बॉक्स दिसत असलं तरी आत मात्र मोबाईलऐवजी टाईल होती.
ही घटना दिवाळीच्या अगदी काही दिवस आधीची आहे, म्हणजेच अमेझॉनने त्यांची ‘दिवाळी खास सरप्राईज डिलिव्हरी’ दिलीच म्हणायची.
प्रेमानंद यांनी लगेच National Cybercrime Reporting Portal (NCRP) वर तक्रार केली आणि त्यानंतर कुमारस्वामी लेआऊट पोलिस ठाण्यातही फिर्याद दाखल केली. पोलिसांनी FIR नोंदवून तपास सुरू केला. दरम्यान NDTVच्या अहवालानुसार, Amazonने प्रेमानंद यांना संपूर्ण रक्कम परत केली आहे.
अशा प्रकारच्या घटना नवीन नाहीत. ई-कॉमर्स पार्सलमध्ये कधी विटा, कधी साबण, तर कधी पाण्याच्या बाटल्या निघण्याच्या तक्रारी आधीही अनेक वेळा आल्या आहेत. पण बहुतांश वेळा ग्राहकांकडे पुरावे नसतात, त्यामुळे रिफंड किंवा रिप्लेसमेंट मिळायला उशीर लागतो.
Amazonसारख्या साइट्स ‘ओपन बॉक्स डिलिव्हरी’ देत नाहीत, त्यामुळे ग्राहकांकडे एकमेव पर्याय म्हणजे पार्सल उघडतानाच व्हिडिओ पुरावा तयार करणे.
तरी आमचा सल्ला एवढाच की महागडे मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स शक्यतो ऑफलाइन स्टोअरमधूनच खरेदी करा. तिथे ऑफरही मिळतात आणि बॉक्समध्ये मोबाईल मिळेल याची खात्रीही असते.
