सांगली : अवघ्या सहा दिवसांवर आलेला मुलाचा लग्न सोहळा... घरात लगीनघाई अशातच सनई-चौकड्यांच्या सुरांएवजी अग्निशमनच्या सायरनने शहर हादरले. मंगल सोहळ्यासाठीचे आनंदी क्षण वेचण्यात सारे गुंतलेले असताना अचानक त्यांच्या या आनंदावर ठिणगी पडली अन् मंगल क्षणांचे स्वप्न आगीत भस्मसात झाले. विट्याच्या सावरकरनगरमधील विष्णू पांडुरंग जोशी यांच्या कुटुंबीयांसाठी सोमवार हा घातवार ठरला. मुलाच्या डोईवर अक्षता टाकण्याचे जोशी कुटुंबीयांचे स्वप्न अधुरेच राहिले.
advertisement
विटा येथील विष्णू जोशी यांच्या जय हनुमान स्टील फर्निचर या भांडी दुकानाला सोमवारी भीषण आग लागली. जोशी कुटुंब मूळचे गोकाकचे विष्णू यांचे वडील पांडुरंग यांनी विट्यात येऊन भांडी व्यवसाय सुरू केला. त्यांची तिसरी पिढी या व्यवसायात उतरली आहे. विट्यातील सावरकरनगरमध्ये चार मजली इमारत बांधून विष्णू जोशी यांनी व्यवसायात चांगलाच जम बसविला होता.
विष्णू यांची दोन मुले मनीष आणि सूरज जोशी हे दोघेही व्यवसाय चांगल्या प्रकारे सांभाळत होते. त्यांचा थोरला मुलगा मनीष यांचा तासगाव येथील नातेवाईक माधव कृष्णा भोसले यांच्या कन्येशी दिनांक 16 नोव्हेंबर रोजी विवाह होणार होता. त्याची तयारी पूर्ण झाली होती. रविवारी विष्णू, सूरज हे दोघे तासगावसह अन्य नातेवाइकांना निमंत्रण पत्रिका देऊन रात्री उशिरा घरी परत आले होते. सोमवारी सकाळी अचानक दुकानात आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रुपधारण केले.
घरातून बाहेर पडण्यासाठी दुकानातूच रस्ता असल्याने दुसऱ्या ाणि तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या जोशी कुटुंबातील सदस्यांना बाहेर पडता आले नाही. त्यातूनही मनीष आणि सूरज हे दोषेही प्रसंगावधान राखून शेजारच्या गॅलरीतून बाहेर पडले; परंतु वडिल विष्णू, आई सुनंदा, गरोदर बहीण प्रियांका आणि दोन वर्षांची चिमुकली भाची सृष्टी यांना बाहेर पडता न आल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला.
मनीष आणि सूरज बचावले पण; डोळ्यांदेखत कुटुंब संपले
इमारतीला आग लागल्यानंतर काही स्थानिक तरुणांनी शेजारच्या घरातील टेसवर जाऊन जोशी कुटुंबातील सदस्यांना बाहेर पडण्याचे आवाहन केले. त्यावेळी मनीष आणि सूरज यांनी गॅलरीतून तरुणांच्या मदतीने सुखरूप सुटका करून घेतली. त्यामुळे हे दोन्ही भाऊ सुदैवाने बचावले. मात्र आई, वडील, बहीण,भाची हे सर्वजण कायमचे निघून गेल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.
दुसर्या मुलाचेही चार महिन्यांवर लग्न
विष्णू जोशी यांना मनीष आणि सूरज ही दोन मुले. यातील मनीष याचा दि.16 नोव्हेंबरला विटा येथील कार्यालयात विवाह होता. त्याची तयारी अंतिम टप्यात आली होती. दुसरा मुलगा सूरज याचाही माथवनगर येथील नातेवाईक मुलीशी साखरपुडा झाला होता. दोघांच्या डोईवर अक्षता टाकण्याचे भाग्य नियतीने हिरावून घेतले.
पाच तासांचा थरार
विट्यातील इमारतीला लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी विटा, पलूस, कडेगाव, तासगाव, कुंडल येशील प्रशिक्षित अग्निशमन विभागाचे कर्मचारी दाखल झाले होते. पाच अग्निशमन गाड्या आणि शेकडो स्थानिक तरुणांच्या मदतीने पाच ते सहा तासांनंतर आग आटोक्यात आली. पाच तासांचा आग्नितांडव महाभयंकर होता.
फ्रीज काॅम्प्रेसर फुटल्याने आग लागल्याची शक्यता
महावितरणच्या प्राथमिक अंदाजानुसार विद्युत मोटारीपर्यंतचा वीजपुरवठा व्यवस्थित आहे. अधिकाऱ्यांच्या प्राथमिक माहितीनुसार; फ्रीजचा काॅम्प्रेसर फुटल्यामुळे अपघात झाला असण्याची शक्यता आहे.
महावितरणमधील विद्युत निरीक्षकांचे विशेष पथक आज भेट देणार
आग लागलेल्याघर आणि दुकानाचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. आणि उर्वरित ठिकाणांचा वीजपुरवठा सुरळीत केला आहे. आगीच्या कारणाचे अधिक स्पष्टीकरण मंगळवारी महावितरणच्या विद्युत निरीक्षकांनी केलेल्या पाहणीनंतर स्पष्ट होईल.
