रेल्वेची 'ही' अपडेट जाणून घेतल्याशिवाय घराबाहेर पडू नका
मध्य आणि पश्चिम रेल्वेने अभियांत्रिकी आणि दुरुस्तीची महत्त्वाची कामं करण्यासाठी रविवारी (तारीख.16) रोजी मोठा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सेवांवर मोठा परिणाम होणार आहे. सीएसएमटी–पनवेल हार्बर मार्गावरील लोकल दोन्ही दिशेने तब्बल 5 तास बंद राहणार असून ठाणे–पनवेल ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सेवा 7 तास बंद राहणार आहे, यामुळे लाखो प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.
advertisement
मध्य रेल्वे
सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत असेल. डाऊन धीम्या लोकल या काळात डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. त्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकांवर थांबून विद्याविहार स्टेशनवर पुन्हा धीम्या मार्गावर येतील. घाटकोपरहून सुटणाऱ्या अप धीम्या लोकल विद्याविहार ते सीएसएमटीदरम्यान अप जलद मार्गावर चालतील आणि कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा येथे थांबतील.
1)पश्चिम रेल्वे – जलद मार्ग
बोरिवली ते राम मंदिर दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत मेगाब्लॉक असेल. अप जलद मार्गावरील लोकल बोरिवली–अंधेरी दरम्यान धीम्या मार्गावर चालतील. तर डाऊन जलद लोकल अंधेरी–गोरेगाव दरम्यान धीम्या मार्गावर धावतील. या कालावधीत काही लोकल पूर्णपणे रद्द केल्या जाणार आहेत.
2)हार्बर लाईन – पनवेल ते वाशी
हार्बर मार्गावर पनवेल–वाशी दरम्यान सकाळी 11.05 ते संध्याकाळी 4.05 पर्यंत ब्लॉक राहील. पनवेलहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 पर्यंत रद्द राहतील. सीएसएमटीहून बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या लोकल सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 पर्यंत बंद असतील.
3)ट्रान्स-हार्बर – ठाणे ते पनवेल
ठाणे–पनवेल ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सकाळी 11.02 ते संध्याकाळी 5.53 पर्यंत थांबणार आहेत. ठाणेहून पनवेलकडे जाणाऱ्या लोकल सकाळी 10.01 ते सायंकाळी 5.20 पर्यंत रद्द राहतील. मात्र, ब्लॉक काळात सीएसएमटी–वाशी दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. ठाणे–वाशी–नेरुळ दरम्यान ट्रान्स-हार्बर सेवा सुरू राहतील.
