पुढच्या वर्षी जी२० संमेलन ब्राझीलमध्ये होणार आहे. बैठक सुरू होण्याआधी जी२० परिषदेचे गेल्या वर्षीचे अध्यक्ष इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो आणि पुढच्या वर्षीचे अध्यक्ष लुइज यांनी सध्याचे जी२० अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक रोपटं भेट म्हणून दिलं.
जी२० शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन हे राजघाटावर महात्मा गांधींच्या समाधी स्थळी श्रद्धांजली वाहिल्यानंतर व्हिएतनामला रवाना झाले. जी२० मध्ये सहभागी झालेल्या इतर नेत्यांनीही राजघाटावर श्रद्धांजली वाहिली. त्या सर्व नेत्यांना पंतप्रधान मोदींनी खादीची शाल भेट देत स्वागत केलं. यावेळी बापु कुटीची माहितीही पंतप्रधान मोदींनी नेत्यांना दिली.
पहिल्या दिवशी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यामध्ये रशिया युक्रेन युद्धानंतर जी२०ची पहिली संयुक्त घोषणा करण्यात आली. भारत, युरोप, मध्य पूर्व यांच्यात आर्थिक कॉरिडॉरवर करार झाला. तसंच सर्व पाहुण्यांसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खास डिनरचे आयोजन केले होते.
