प्रीतम पंडित, प्रतिनिधी, सोलापूर: राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं असून हाताशी आलेली पिकंदेखील गेल्याने बळीराजा खचला आहे. अशातच राज्यातून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेकजण सरसावले आहेत. राजकीय पक्ष, राजकीय नेत्यांकडूनही मदत केली जात आहे. पूरग्रस्तांसाठी आपण किती धडपड करत आहोत असे दाखवण्याचा प्रयत्नही काही नेत्यांकडून होत आहे. अशाच एका घटनेच्या वेळी शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी खडे बोल सुनावले.
advertisement
सोलापूर शहर आणि जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. सीना नदीला महापूर आल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी उद्धवस्त झाल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांना आणि खेड्यातील नागरिकांना सर्वच स्तरातून मदत करण्याच्या कामाला अगोदर प्राध्यान्य दिले जात आहे. शिवसेना शिंदें गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे व त्यांच्या पक्षातील प्रमुख नेते सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात जाऊन खेड्या पाड्यातील लोकांना अन्नधान्याचे किट वाटप करत आहेत.
अन् जिल्हाधिकाऱ्यांनी वाघमारेंना झापलं....
उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी या गावात जाऊन शिवसेना शिंदे गटाकडून अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. त्याच दरम्यान, ज्योती वाघमारे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना कॉल केला. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना अपुऱ्या मदतीच्या मुद्यावर फैलावर घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी उलट त्यांनाच झापलं
ज्योती वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांन फोन करत कॉल स्पीकरवर ठेवला. या गावाची लोकसंख्या इतकी मोठी असून प्रशासनाकडून खूपच कमी संख्येत किट वाटप केले जात असल्याची तक्रार ज्योती वाघमारे यांनी केली. त्यावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उत्तर देताना, आम्ही शक्य होईल तितकी मदत करत आहोत असे सांगितले. तुम्ही सध्या त्या गावात आहात तर तुम्ही किती किट आणल्या आहेत, असा सवाल जिल्हाधिकाऱ्यांनी केला. त्यावर ज्योती वाघमारे या तोंडघशी पडल्या.
3000 लोकसंख्या असलेल्या गावात ज्योती वाघमारे यांनी शिवसेना पक्षाकडून फक्त 200 किट वाटप करण्यासाठी आल्या होत्या. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी फोन वरून बोलताना उलट ज्योती वाघमारेना खडे बोल सुनावले, आता ही राजकारण करण्याची वेळ नाही, तुमचं राजकारण नंतर करा, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सुनावले. पूरग्रस्तांना आम्ही बाहेर काढलं, तुम्ही काढलं नसल्याचंही आशीर्वाद यांनी म्हटले.