दौंड तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा मजबूत गड मानला जाणारा परिसर भाजपने हादरवून सोडला आहे. आप्पासाहेब पवार हे शरद पवार गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांशी असलेला थेट संवाद आणि स्थानिक पातळीवरील प्रभाव यामुळे त्यांचे तालुक्यात मोठे वजन होते. अशा नेत्याच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा फटका बसल्याचे चित्र आहे.
advertisement
उमेदवारी देत भाजपचा मोठा डाव
आमदार राहुल कुल यांनी खडकी–देऊळगाव राजे गटातून आप्पासाहेब पवार यांना ऐनवेळी उमेदवारी देत मोठा डाव टाकला. भाजपच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात समीकरणे झपाट्याने बदलली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे अत्यंत महत्त्वाची म्हणून पाहिले जात आहे. भाजपने केवळ पक्षप्रवेश करून न थांबता थेट उमेदवारी देऊन आप्पासाहेब पवार यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
आगामी निवडणुकांमध्ये याचा थेट परिणाम होण्याची शक्यता
या घडामोडीमुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील गटात अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. दौंड तालुक्यातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, काही जण भाजपकडे झुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांमध्ये मात्र उत्साहाचे वातावरण आहे. आप्पासाहेब पवार यांच्या भाजप प्रवेशामुळे पुणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. आगामी निवडणुकांमध्ये याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.
पक्षाकडून डावललं जात असल्याने नाराज
दौंड तालुक्यात आप्पासाहेब पवार यांना मानणारा स्वतंत्र वर्ग आहे. लोकसभा निवडणुकीला आप्पासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली खासदार सुप्रिया सुळे यांना दौंड तालुक्यात चांगले मताधिक्य मिळाले होते. मात्र राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाने विधानसभेला त्यांना डावलून माजी आमदार रमेश थोरात यांना उमेदवारी दिल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. पक्षाकडून डावलले जात असल्याने अखेर आप्पासाहेब पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
