पतीचं निधन अन् कुटुंबाची जबाबदारी, अंबाबाई मंदिराजवळ आप्पे विकून 'ती'नं बांधलं घर
- Published by:News18 Marathi
- Reported by:Saiprasad Nagesh Mahendrakar
Last Updated:
पतीच्या अकाली निधनानंतर 2007 साली मंगल पाटील यांनी अंबाबाई मंदिर परिसरात आप्पे, इडली, डोसा, उत्ताप्पा असे पदार्थ बनवून विकण्यास सुरुवात केली.
advertisement
1/7

<a href="https://news18marathi.com/maharashtra/kolhapur/">कोल्हापुरातील</a> अंबाबाई मंदिर हे वर्षाचे 365 दिवस भाविकांनी गजबजलेलं असतं. त्यामुळे या परिसरात बऱ्याच महिला व्यावसायिका नाष्ट्याचे स्टॉल लावून त्यावर आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. यापैकीच एक मंगल पाटील या आहेत. गेली जवळपास 17 वर्षे त्या त्यांचा साऊथ इंडियन पदार्थांचा स्टॉल लावत आहेत. याच स्टॉलमुळे घरची परिस्थिती सुधारण्यास खूप फायदा झाल्याचे त्या सांगतात.
advertisement
2/7
खरंतर मंगल पाटील या आपल्या पतीसह सुखी संसार करत होत्या. मात्र पतीच्या निधनानंतर त्या त्यांचा मुख्य आधार गमावून बसल्या. मात्र मुलाबाळासाठी त्यांनी धीर सोडला नाही. त्यातूनच 2007 साली त्यांनी अंबाबाई मंदिर परिसरात आप्पे, इडली, डोसा, उत्ताप्पा असे पदार्थ बनवून विकण्यास सुरुवात केली. रोज पहाटे येऊन त्या हा स्टॉल लावत असत. रोज सकाळ आणि संध्याकाळी हा स्टॉल लावत असल्याचे त्या सांगतात.
advertisement
3/7
मंगल यांची घरची परिस्थिती बेताचीच होती. त्यांचे पती राजेंद्र पाटील महानगरपालिकेचे कर्मचारी होते. अचानक हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले होते. पतीच्या जाण्याने सर्व जबाबदारी मंगल यांच्या अंगावर पडली. मंगल या सुरुवातीला घरगुती मेस चालवत असत.
advertisement
4/7
त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर पदार्थ बनवण्याचा अनुभव होता. म्हणूनच त्यांनी हा नाष्ट्यचा स्टॉल लावण्यास सुरुवात केली. सुरवातीला त्या शिरा, उपमा, पोहे असे पदार्थ बनवत असत. मात्र अंबाबाई मंदिर परिसरात येणाऱ्या दक्षिणेकडील भाविकांच्या संख्येमुळे त्यांनी दाक्षिणात्य पदार्थ विकण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांना त्यांच्या मुलींनीही मदत केल्याचे मंगल सांगतात.
advertisement
5/7
मंगल यांनी अंबाबाई मंदिर परिसरात पहिल्यांदाच आप्पे, इडली या पदार्थांचा स्टॉल लावायला सुरुवात केली होती. त्यांच्या बरोबरीने विक्रेते कोणी नसल्याने त्यांचा चांगला खप होत होता. सुरुवातीला फक्त 5 रुपयांना त्या आप्पे विकत असत. तर आता एक प्लेट आप्पे 30 रुपयांना त्यांच्याकडे मिळतात.
advertisement
6/7
मिळणाऱ्या पैशांतून बचत करत मंगल यांनी आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण केले. मुला-मुलींची लग्नं लावून दिली. इतकेच नाही तर बचतीच्या पैशांतून आणि थोडे कर्ज करून स्वतःचे घर देखील बांधले असल्याचे देखील मंगल यांनी सांगितले.
advertisement
7/7
दरम्यान, आईने केलेले कष्ट पाहून आणि तिच्या शारीरिक व्याधींमुळे मंगल यांचा मुलगा निशांत हा देखील गेली काही वर्षांपासून आईबरोबर थांबतो. या आप्प्याच्या स्टॉलने आम्हाला भरपूर काही दिले असल्याचे मत निशांत यानेही व्यक्त केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/कोल्हापूर/
पतीचं निधन अन् कुटुंबाची जबाबदारी, अंबाबाई मंदिराजवळ आप्पे विकून 'ती'नं बांधलं घर