उत्तर कोरियाच्या किम जोंग उनची सटकली, अमेरिकेने माघार घेताच क्रूझ क्षेपणास्त्रे डागली; इराणवर हल्ला करणाऱ्या ट्रम्प यांना बसला धक्का
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
North Korea vs South Korea: अमेरिका-दक्षिण कोरियाच्या ‘फ्रीडम शील्ड’ लष्करी सरावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने 5000 टन क्षमतेच्या नव्या युद्धनौकेवरून रणनीतिक क्रूझ क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेत शक्तिप्रदर्शन केले. अमेरिका-दक्षिण कोरियाच्या ‘फ्रीडम शील्ड’ लष्करी सरावाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या चाचणीमुळे आशिया-प्रशांत क्षेत्रातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
1/9

सध्या जग जणू महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे असल्याचे चित्र आहे. एका बाजूला 28 फेब्रुवारीपासून सुरू झालेला इराण आणि अमेरिका-इस्त्रायल यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे. तर दुसऱ्या बाजूला उत्तर कोरियाने आपल्या लष्करी ताकदीचे प्रदर्शन करत तणावात आणखी भर घातली आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी मंगळवार 10 मार्च 2026 रोजी नव्या आणि अत्यंत शक्तिशाली 5000 टन क्षमतेच्या नौदलातील डेस्ट्रॉयरवरून रणनीतिक क्रूझ क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतली.
advertisement
2/9
‘चो ह्योन’ क्लासच्या या युद्धनौकेतून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांनी सुमारे तीन तास समुद्राच्या वर उड्डाण करत अचूकपणे आपले लक्ष्य भेदले. या संपूर्ण चाचणीवर किम जोंग उन स्वतः आपल्या मुलीसह लक्ष ठेवून होते. त्यामुळे प्योंगयांगने आपली समुद्री लष्करी ताकद मोठ्या प्रमाणात वाढवली असल्याचे संकेत मिळत आहेत. ही चाचणी अशा वेळी घेण्यात आली आहे, जेव्हा दक्षिण कोरिया आणि अमेरिका आपला वार्षिक संयुक्त लष्करी सराव ‘फ्रीडम शील्ड’ करत आहेत.
advertisement
3/9
नवीन डेस्ट्रॉयरवरून क्षेपणास्त्र चाचणी: उत्तर कोरियाने ज्या जहाजावरून क्षेपणास्त्रे डागली ते ‘चोए ह्योन’ क्लासमधील नवीन डेस्ट्रॉयर असल्याचे सांगितले जात आहे. हे सुमारे 5000 टन क्षमतेचे आधुनिक युद्धनौक आहे. सरकारी दूरदर्शनवरील फुटेजमध्ये किम जोंग उन कमांड सेंटरमधून या चाचणीवर लक्ष ठेवताना दिसले. त्यांच्या सोबत त्यांची मुलगीही उपस्थित होती. या चाचणीदरम्यान एकामागून एक अनेक क्रूझ क्षेपणास्त्रे डागण्यात आली.
advertisement
4/9
‘फ्रीडम शील्ड’ सरावाच्या पार्श्वभूमीवर चाचणी: या चाचणीचा वेळही अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियाने 9 मार्चपासून आपला वार्षिक संयुक्त लष्करी सराव सुरू केला आहे. ‘फ्रीडम शील्ड’ नावाचा हा सराव 19 मार्चपर्यंत चालणार आहे. या सरावाचा उद्देश दोन्ही देशांची संयुक्त संरक्षण क्षमता अधिक मजबूत करणे हा आहे. मात्र उत्तर कोरिया नेहमीच या लष्करी सरावांना स्वतःविरोधातील कृती मानतो.
advertisement
5/9
अमेरिकेने THAAD प्रणाली हटवण्यास सुरुवात: या घडामोडींमध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अमेरिकेने दक्षिण कोरियाच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या अत्याधुनिक THAAD (Terminal High Altitude Area Defense) क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीतील काही भाग हटवण्यास सुरुवात केली आहे. अहवालानुसार इराणसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे अमेरिकेला या संरक्षण प्रणालीची गरज आता पश्चिम आशिया म्हणजेच मिडिल ईस्टमध्ये अधिक भासत आहे.
advertisement
6/9
सोंगजू बेसवरून हलवले लाँचर्स: सियोलच्या दक्षिणेला असलेल्या सोंगजू बेसमधून THAAD लाँचर्स काढून ओसान एअर बेसकडे हलवताना दिसले आहेत. दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने मात्र आपली सेना उत्तर कोरियाच्या कोणत्याही हल्ल्याला तोंड देण्यास सक्षम असल्याचे सांगितले आहे. तरीही राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली. त्यांनी कबूल केले की अमेरिका आपल्या लष्करी हितासाठी सुरक्षेची साधने हटवत आहे आणि दक्षिण कोरिया याला पूर्णपणे रोखू शकत नाही.
advertisement
7/9
परिस्थितीचा फायदा घेण्याचा उत्तर कोरियाचा प्रयत्न: तज्ज्ञांच्या मते सध्या जगातील अस्थिर परिस्थितीचा फायदा घेण्याचा उत्तर कोरिया प्रयत्न करत आहे. अमेरिका सध्या इराणसोबतच्या संघर्षात गुंतलेला असल्यामुळे किम जोंग उन आपल्या क्षेपणास्त्र ताफ्याचे आधुनिकीकरण करून अमेरिकेवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
advertisement
8/9
इराणला उघड समर्थन: उत्तर कोरियाने उघडपणे इराणला पाठिंबा दिला आहे आणि अमेरिका-इस्त्रायलच्या हल्ल्यांना “बेकायदेशीर” ठरवले आहे. प्योंगयांगने इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांच्याबद्दलही आदर व्यक्त केला आहे. ज्यामुळे दोन्ही देशांमधील वाढती जवळीक स्पष्ट होते. तसेच इराणच्या सार्वभौमत्वाचा आदर करत असल्याचे सांगत उत्तर कोरियाने प्रादेशिक शांततेला धक्का देण्यासाठी अमेरिका आणि इस्त्रायलला जबाबदार ठरवले.
advertisement
9/9
पुढील काळात वाढू शकतो तणाव: जर अमेरिका मिडिल ईस्टमध्ये दीर्घकाळ गुंतून राहिला, तर उत्तर कोरिया आणखी धोकादायक शस्त्रे किंवा अणुचाचण्या करून या प्रदेशातील तणाव आणखी वाढवू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आशिया-प्रशांत क्षेत्रात पुन्हा एकदा अस्थिरतेचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/विदेश/
उत्तर कोरियाच्या किम जोंग उनची सटकली, अमेरिकेने माघार घेताच क्रूझ क्षेपणास्त्रे डागली; इराणवर हल्ला करणाऱ्या ट्रम्प यांना बसला धक्का