शिवसेना शिंदे गट हे दुबार आणि संशयित देखील याच मुद्द्यावर आक्रमक झाली आहे. शिंदे गटाने नाशिक येथील मतदार याद्यांमध्ये 2,98,853 दुबार मतदार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच, महानगरातील मतदार यादीतील बोगस आणि दुबार मतदारांची नावे त्वरित वगळून पारदर्शक आणि अचूक यादी तयार करण्याची मागणी केली आहे.
शिवसेनेच्या शिंदे गटाने म्हटले की, नाशिक जिल्ह्यातील आणि महानगरातील मतदार याद्यांमध्ये अनेक दुबार, बनावट, अपूर्ण पत्ते, चुकीचे पत्ते, चुकीचे फोटो आणि कुटुंबातील सदस्यांचे नावे वेगवेगळ्या ठिकाणी नोंदवलेली आहेत. यामुळे मतदार यादीत प्रचंड घोळ निर्माण झाल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.
advertisement
आपल्या दाव्याच्या पुष्टीसाठी शिंदे गटाने काही विशिष्ट उदाहरणेही दिली आहेत. त्यानुसार, नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात 86,239, नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात 58,034, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात 93,574 आणि देवळाली-नाशिकरोड मतदारसंघात 61,006 दुबार मतदार असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे चारही मतदारसंघांमध्ये एकूण 2,98,853 दुबार मतदार असल्याचे शिंदे गटाने म्हटले आहे.
निवडणूक मतदार यादी सुधारणेसाठी सूचना...
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना उद्देशून शिंदे गटाने काही सुधारणा सुचवलेल्या आहेत. यामध्ये दुबार नावे वगळणे, मयत व्यक्तींची नावे वगळणे, मतदार नावे योग्य मतदान केंद्रातच असावीत, ओळखपत्रावर फोटो स्पष्ट असावा, प्रत्येक मतदारासाठी बायोमॅट्रिक कार्ड असावे आणि आधारशी जोडणे अनिवार्य करणे यासारख्या शिफारशी करण्यात आल्या आहेत.
