मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगेंच्या नेतृत्वात आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू झाले आहे. जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून हजारो लोक मुंबईत दाखल झाले आहेत. मागील 3 दिवसांत मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. आज, मुंबईत मराठा आंदोलकांची संख्या काही प्रमाणात वाढली आहे. मुंबई महापालिका आणि सीएसएमटी परिसरात मोठी गर्दी उसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मराठा आंदोलनाच्या आड गुन्हेगार मोकाट आहेत का असा सवाल उपस्थित करणारी घटना घडली आहे.
advertisement
मराठा आंदोलकांसारखे वाटणारी काही अज्ञातांनी एका दुकानात चोरी केली असल्याचे समोर आले आहे. गळ्यात भगवे गमछे घातलेल्या काही तरुणांनी एक दुकान फोडत चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मुंबईतील फोर्ट परिसरातील दादाजी स्ट्रीट येथे आंदोलनाच्या गोंधळाचा फायदा घेत काही तरुणांनी कपड्यांच्या दुकानात चोरी केल्याची घटना उघड झाली आहे. माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
चोरी झाली कशी?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी स्क्रू ड्रायव्हरच्या साहाय्याने दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी दुकानातील काही कपडे आणि अंदाजे सहा हजार रुपयांची रोकड लंपास केली. चोरीचा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे रेकॉर्ड झाला आहे.
तक्रारदाराने या घटनेची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करून मुख्यमंत्री आणि मुंबई पोलिस आयुक्त यांना टॅग केले आहे. त्यामुळे प्रकरणाला अधिक गांभीर्य आले असून पोलिसांनी आरोपींचा शोध वेगाने सुरू केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. तथापि, काही उपद्रवी तरुणांच्या कृत्यामुळे या आंदोलनावर गालबोट लागत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, आज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस असून संपूर्ण राज्याचे लक्ष या आंदोलनावर केंद्रीत आहे.