मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची जवळपास 7 मते फुटल्याचं उघड झालंय. यातील बहुतेक मतं ही काँग्रेसची असल्याचं समोर येतंय. त्यामुळे महाविकास आघाडीला पराभवाच्या गर्तेत लोटणारे काँग्रेसचे हे विभीषण कोण? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
विधानपरिषदेच्या निकालानंतर महाविकास आघाडीत अपेक्षेप्रमाणे आता नाराजीनाट्य सुरू झालंय. ज्या शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी आता काँग्रेससह मित्रपक्षांविरोधात थेटपणे नाराजीचा सूर आवळला.
advertisement
विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे एकूण 66 मते होती.
यात काँग्रेसचे आमदारांची 37 मते
पवारांच्या राष्ट्रवादीचे 12+1 शे.का.प. अशी 13 मते
आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडे 15+1 अपक्ष अशी 16 मते होती
पण, प्रत्यक्षात जेव्हा महाविकास आघाडीला मतदान झालं त्यात मात्र पहिल्या पसंतीची अवघी 59 मतंच मविआच्या तिन्ही उमेदवारांना मिळाल्याचं समोर आलं.
काँग्रेसच्या डॉ.प्रज्ञा सातव या पहिल्या पसंतीची 25 मते मिळवत विजयी झाल्या तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मिलिंद नार्वेकरांनी पहिल्या पसंतीचे 22 आणि दुसऱ्या पसंतीचे दोन मतं मिळाली आणि जयंत पाटलांना मात्र पहिल्या पसंतीचे अवघी 12 मतेच मिळवण्यात यश आलं.
यांची एकत्रित बेरीज केल्यास 25+22+12 अशी अवघी 59 मतेच महाविकास आघाडीच्या पारड्यात पडली म्हणजे असलेल्या मतांमधली एकूण 7 मते फुटल्याचं स्पष्ट झालं आहे.
(Vidhan Parishad Election: ठाकरेंचा डाव यशस्वी, 'खास' माणूस झाला आमदार; आता संवादाचा मार्ग मोकळा?)
फुटलेली ही सर्वच्या सर्व 7 मते ही काँग्रेसची असल्याचा दावा महाविकास आघाडीकडूनच केला जात आहे. त्यामुळं महाविकास आघाडीच्या पराभवावर हसणारे हे विभीषण कोण? असा सवाल आता उपस्थित होतोय. 2022 च्या विधान परिषद निवडणुकीचीच पुनरावृत्ती झाल्यानं, काँग्रेसच्या नरमाईच्या भूमिकेवरही मित्रपक्षांनी सवाल उपस्थित केला आहे.
खरंतर काँग्रेसला आधीच त्यांचे आमदार फुटणार याची कल्पना होती. तसं जाहीर संकेतही काँग्रेसच्या आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिले होते. तसंच काँग्रेसचे वांद्र्यातील आमदार झिशान सिद्दिकींनी मतदानाआधीच त्यांची नाराजीही उघड केली होती. एवढंच नाहीतर झिशान सिद्दिकींना व्हॉट्सअप ग्रुपमधूनही बाहेर काढून टाकलं.
(Maharashtra Politics: महाविकास आघाडीमध्ये आवाज कुणाचा?)
4 आमदार क्रॉस वोटिंग करणार हे काँग्रेस नेतृत्वानं गृहीत धरलं होतं. पण,प्रत्यक्षात त्याहून जास्त मतं फुटल्यानं आता काँग्रेसकडून या फुटीर आमदारांवर कठोर कारवाईचे संकेत दिले जात आहे.
एकंदरीतच, पक्षाचा आदेश झुगारून महाविकास आघाडीविरोधात मतदान करणाऱ्या काँग्रेस आमदारांमुळे काँग्रेस पक्ष पुन्हा टीकेची धनी बनला आहे. त्यामुळं महाविकास आघाडीच्या पराभवावर हसणाऱ्या या विभीषणांना शोधून, काँग्रेस आता त्यांच्यावर काय कारवाई करतं? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
