किराणा घेऊन घरी जाताना अडवले
या प्रकरणातील तक्रारदार तरुण हा व्यवसायाने ट्रकचालक असून, तो कात्रजमधील खोपडेनगर परिसरात वास्तव्याला आहे. हल्ल्याच्या दिवशी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास तो एका किराणा मालाच्या दुकानातून साहित्य घेऊन आपल्या घरी निघाला होता. याचवेळी, रस्त्यात तिघा अज्ञातांनी त्याला अचानक अडवले. कोणताही कारण नसताना त्यांनी या तरुणाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
advertisement
"आमची माहिती पोलिसांना का दिली?"
तरुणाला अडवल्यानंतर आरोपींनी "तू आमची माहिती पोलिसांना का दिलीस? तू पोलिसांचा खबरी आहेस," असा जाब विचारायला सुरुवात केली. तसेच त्याला अश्लील शब्दांत शिवीगाळ केली. यानंतर त्यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर, आरोपींनी कोणताही विचार न करता सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने तरुणावर वार केले.
या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत तातडीने गुन्हा दाखल केला. हा हल्ला नेमका कुणी केला? याची माहिती अद्याप समोर आली नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
