पुणे : शिरूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या मातब्बर गावडे कुटुंबाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांचे चिरंजीव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र गावडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
advertisement
पुणे येथील भाजप कार्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राहुल कुल, पुणे जिल्हा भाजप अध्यक्ष प्रदीप कंद आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुनीता गावडे, शिरूरच्या माजी नगराध्यक्ष मनीषाताई गावडे, शिरूर तालुका देखरेख संघाचे अध्यक्ष बाबाजी निश्चित, माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव जोरी, संपत पानमंद, बाळकृष्ण कड, सुनिताताई कड, कांचनताई सांडभोर यांच्यासह तालुक्यातील अनेक सरपंच, चेअरमन व शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
गावडे समर्थकांमध्ये तीव्र असंतोष
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी जिल्हा परिषद गटावर गेली ६४ वर्षे गावडे कुटुंबाचे एकहाती नेतृत्व असून, हे कुटुंब सातत्याने शरद पवार यांच्या नेतृत्वाशी निष्ठावंत राहिले आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर गावडे कुटुंब अजित पवार व दिलीप वळसे पाटील यांच्या सोबत राहिले होते. तर वळसे पाटलांच्या मागील चारही विधानसभा निवडणुकीत गावडे कुटुंबाची वळसे पाटलांना खंबीर साथ मिळाली होती. जिल्हा परिषदेत सलग पन्नास वर्षे प्रतिनिधित्व करणाऱ्या या कुटुंबातील राजेंद्र गावडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मागील तीन महिन्यांपूर्वीच पूर्ण ताकदीने तयारी करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सर्व तयारी पूर्ण करून प्रचाराची पहिली फेरीही यशस्वीरीत्या पार पडली होती. मात्र ऐनवेळी पक्षाने शरदचंद्र पवार गटातील त्यांच्या विरोधकाला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याची बातमी समोर येताच गावडे समर्थकांमध्ये तीव्र असंतोष पसरला.
गावडे यांच्या निवासस्थानी समर्थकांची मोठी गर्दी
ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच टाकळी हाजी येथील गावडे यांच्या निवासस्थानी समर्थकांनी मोठी गर्दी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेचा जाहीर निषेध व्यक्त केला. या निर्णयामुळे वयाच्या ८५ व्या वर्षातही पक्षासाठी अहोरात्र झटणाऱ्या माजी आमदार पोपटराव गावडे यांनाही मोठा धक्का बसला. आपल्या आयुष्याचा मोठा काळ पक्षासाठी खर्च करणाऱ्या या ज्येष्ठ नेत्याच्या भावना अनावर झाल्याचे चित्र पाहून उपस्थित कार्यकर्त्यांचेही अश्रू अनावर झाले. या भावनिक वातावरणातच गावडे समर्थकांनी एकमुखाने अन्य पक्षात प्रवेश करण्याचा आग्रह धरला.
अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, आमदार राहुल कुल व प्रदीप कंद यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांमुळे आणि त्यांच्या आग्रहामुळे राजेंद्र गावडे यांनी भाजपचा मार्ग स्वीकारल्याचे सांगण्यात आले.
गावडे कुटुंबाच्या प्रवेशामुळे शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसणार असून, येत्या निवडणुकांमध्ये याचे पडसाद उमटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, शिरूर येथे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माजी आमदार पोपटराव गावडे यांच्यासह तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश होणार आहे.
