संबंधित ज्येष्ठ महिला गेल्या अनेक दिवसांपासून असह्य पोटदुखी, लघवीला त्रास होणे आणि पोटातील जडपणामुळे त्रस्त होत्या. त्यांना साध्या हालचाली करणेही कठीण झाले होते. स्थानिक पातळीवर सोनोग्राफी केल्यानंतर त्यांच्या गर्भाशयाच्या पिशवीला मोठी गाठ असल्याचे निदान झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांना बारामती येथील मेहता हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
डॉ. विशाल मेहता यांनी केलेल्या सखोल तपासणीत ही गाठ अत्यंत क्लिष्ट असल्याचे दिसून आले. ही मांसल गाठ शरीरातील अत्यंत महत्त्वाच्या अवयवांना, जसे की मूत्राशय, आतडे आणि लघवीच्या नळीला घट्ट चिकटलेली होती. थोडीशी चूकही रुग्णाच्या जीवावर बेतू शकली असती. अशा जोखमीच्या परिस्थितीत डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.
advertisement
डॉ. विशाल मेहता यांच्या नेतृत्वाखाली डॉ. निकिता मेहता आणि डॉ. पुष्पदंत रुगे या पथकाने तब्बल चार तास ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. अत्यंत सावधगिरीने ही ४.२ किलोची गाठ शरीराच्या इतर भागांना इजा न पोहोचवता बाहेर काढण्यात आली. बारामतीच्या डॉक्टरांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि अचूक निदानामुळे एका मोठ्या संकटातून या महिलेची सुखरूप सुटका झाली आहे.
