मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रगती नगर परिसरातील आहे. इथं तक्रारदाराचं एक हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये घुसून काही तरुणांनी हप्ता मागितला होता. मात्र हॉटेल मालकाने हप्ता देण्यास नकार दिला.
याच कारणातून शुक्रवारी रात्री साडे आठच्या सुमारास सहा ते सात तरुण दुचाकीने त्याठिकाणी आले. त्यांनी हॉटेलमध्ये घुसून कामगारांकडे मालक कोण आहे? मालक कुठाय? अशी विचारणा केली. यावेळी मालक समोर आले. त्यांनी टोळक्याकडे काय झालं? अशी विचारणा केली. यावेळी टोळक्याने त्यांना दमदाटी करत हॉटेलच्या बाहेर नेलं.
advertisement
याठिकाणी सर्व आरोपींनी हॉटेल मालकाला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हुडी घालून आलेले आरोपी मालकाला मारताना स्पष्टपणे दिसत आहे. मारहाणीच्या या घटनेनंतर पीडित हॉटेल मालकाने तातडीने बारामती शहर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
