ही घटना २२ डिसेंबर रोजी सकाळी घडली. फिर्यादी संदीप गोरख होळकर (रा. सदोबाचीवाडी) हे वडगाव निंबाळकर येथील एका हॉटेलसमोर असताना, आरोपींनी त्यांना बळजबरीने एका पांढऱ्या रंगाच्या स्वीफ्ट कारमध्ये बसवून पळवून नेले. जमिनीच्या वादाचा राग मनात धरून मुख्य आरोपी तेजस ऊर्फ बंटी होळकर याने आपल्या साथीदारांच्या मदतीने संदीप यांना मावळ तालुक्यातील उर्से येथील एका उसाच्या शेतात नेले.
advertisement
मानवतेला काळिमा फासणारी बाब म्हणजे, आरोपी बंटी होळकर याने मारहाण सुरू असताना फरार आरोपी शंभू कारंडे याला व्हिडिओ कॉल केला आणि संदीप यांना होत असलेली बेदम मारहाण थेट दाखवली. "आमच्या नादाला लागला तर जिवे मारू," अशी धमकी देऊन आरोपींनी फिर्यादीला लाकडी दांडक्याने झोडपून काढले. त्यानंतर जखमी अवस्थेत संदीप यांना दारू पाजून बारामतीतील होळ परिसरात सोडून आरोपी पसार झाले.
वडगाव निंबाळकर पोलिसांनी तांत्रिक तपास करून तेजस होळकरसह साहिल गायकवाड, संकेत भिसे आणि सनी सकट या चौघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कार आणि लाकडी दांडके जप्त केले आहेत. तसेच हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजही पुरावा म्हणून हस्तगत करण्यात आले आहे. सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांची येरवडा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
