९० सीसीटीव्ही आणि ४८ तासांचा सापळा: ३१ डिसेंबर रोजी बावधन बुद्रुक येथून नागेश शिंदे यांची गाडी चोरीला गेली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील ९० सीसीटीव्ही फुटेजेस तपासले. तांत्रिक तपासादरम्यान, चोरीचे वाहन घेऊन काही संशयित भुगाव रोड परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने त्या भागात ४८ तास पाळत ठेवली.
advertisement
३० किलोमीटर थरारक पाठलाग: संशयित आरोपींनी पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हार न मानता तब्बल ३० किलोमीटरपर्यंत त्यांच्या गाडीचा पाठलाग केला आणि अखेर सापळा रचून तिघांना जेरबंद केले.
धनाजी नागनाथ लोकरे (३५, रा. माढा, सोलापूर), दत्तात्रय उर्फ सतीश सदाशिव जाधव (३५, रा. उरळी देवाची), अमित नागनाथ गवळी (३०, रा. मोहोळ, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. यातील धनाजी याच्यावर यापूर्वी १० गुन्हे दाखल आहेत. सतीश याच्यावर ७ गुन्हे दाखल आहेत आणि अमित याच्यावर ५ गुन्हे दाखल आहेत.
आरोपींच्या चौकशीतून बावधन, चाकण, सासवड आणि महाळुंगे एमआयडीसी परिसरातील वाहनचोरीचे एकूण ५ गुन्हे उघडकीस आले आहेत. ही यशस्वी कामगिरी पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली बावधन पोलिसांनी केली.
