पुणे : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात व्हीआयपी दर्शनावरून वाद निर्माण झाला आहे. मंदिर दुरुस्तीच्या कामामुळे सर्वसामान्य भाविकांसाठी गेल्या अडीच महिन्यांपासून मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. मात्र भाजपचे खासदार डॉ. निशिकांत दुबे यांच्यासाठी मंदिर खुले करून व्हीआयपी दर्शन देण्यात आल्याचा आरोप होत आहे.
डॉ. निशिकांत दुबे हे झारखंड च्या गोड्डा मतदार संघातून चार वेळा भापकडून निवडून आलेले खासदार आहे. सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकामासह भाविकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी 9 जानेवारी 2026 पासून तीन महिन्यांसाठी भीमाशंकर मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे हजारो किलोमीटर पायी तसेच सायकल वारी करून येणाऱ्या भाविकांनाही दर्शन न घेता परत जावे लागत आहे.
advertisement
महादेवाच्या मंदिरात दुजाभाव का?
अशातच हेलिकॉप्टरने आलेल्या खासदार डॉ. निशिकांत दुबे यांना विशेष परवानगी देऊन मंदिरात दर्शन घडवण्यात आल्याने भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. राजकीय नेत्यांसाठी मंदिर खुले आणि सर्वसामान्यांसाठी बंद का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. महादेवाच्या मंदिरात दुजाभाव का? प्रशासनावर भाविकांचा संताप व्यक्त होत आहे.
भीमाशंकर मंदिर का बंद ठेवण्यात आले आहे?
2027 साली नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ 2025 मधील अनुभवाच्या आधारे नाशिक कुंभमेळा कालावधीत नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या लाखो भाविकांपैकी मोठ्या संख्येने भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भेट देण्याची शक्यता आहे. साधारणत दररोज सुमारे एक लाख भाविक येथे येण्याची शक्यता लक्षात घेता जुना सभामंडपाचे क्षेत्र कमी पडणार असल्यामुळे नवीन भव्य सभामंडपाचे काम हाती घेण्यात आलेले आहे. त्याबरोबरच पायरी मार्गाचे काम देखील सुरू करण्यात आलेले आहे. मुख्य सभामंडप पूर्णत उतरविण्यात आल्यामुळे नवीन सभामंडप तयार करतानाभीमाशंकर येथे रोज होणारी गर्दी लक्षात घेता मंदीर दर्शनासाठी बंद केल्याशिवाय सदरील काम करणे शक्य होणार नव्हते. त्यामुळे कामांच्या अंमलबजावणीदरम्यान बांधकाम साहित्य, मोठ्या आकाराचे दगड व अन्य यंत्रसामग्री मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे भाविकांची सुरक्षितता अबाधित राखणे तसेच विकास आराखड्यातील कामे नियोजित कालमर्यादेत पूर्ण करणे या उद्देशाने यापूर्वी मंदिर तीन महिन्यांसाठी ठेवण्यात आले आहे.
हे ही वाचा :
