श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली असून, त्यातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याचे काम आता प्रत्यक्षात सुरू होणार आहे. बांधकाम काळात भाविकांची सुरक्षितता अबाधित राहावी, यासाठी मंदिर दर्शन तात्पुरते बंद ठेवणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या संदर्भात 23 डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासन, भीमाशंकर देवस्थान संस्थानचे विश्वस्त, स्थानिक दुकानदार आणि ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते मंदिर 9 जानेवारीपासून तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
advertisement
Pune Metro : पुणेकरांच्या कामाची बातमी! हिंजवडी मेट्रो धावणार पण..., महत्त्वाची अपडेट आली समोर
दरवर्षी भीमाशंकर येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. विशेषतः श्रावण महिना आणि महाशिवरात्रीच्या काळात भाविकांची मोठी गर्दी होत असते. याच कालावधीत 18 फेब्रुवारी 2026 रोजी पवित्र महाशिवरात्री येत असल्याने भाविकांच्या श्रद्धेचा विचार करून 12 ते 18 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था आणि नियोजन प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे.
दरम्यान, बंद कालावधीत मंदिरातील नित्य पूजा-अर्चा आणि धार्मिक विधी परंपरेनुसार सुरूच राहणार असून, ब्रह्मवृंद व गुरव पुजारी नियमित पूजा करतील. मात्र, सामान्य भाविकांसाठी थेट दर्शन आणि मंदिर परिसरात प्रवेश पूर्णतः बंद राहणार आहे. बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी-कर्मचारी आणि भीमाशंकर ग्रामस्थांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर भविष्यातील वाढती भाविकांची गर्दी लक्षात घेता ही विकासकामे अत्यावश्यक असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. भाविकांनी आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.






