शहरातील सर्व क्लाऊड किचनचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले गेले असून, रहिवासी क्षेत्रातील तक्रारी गोळा करण्याचे काम सुरू आहे. विशेषतहा सांगवी परिसरात क्लाऊड किचनमुळे ध्वनी आणि वायुप्रदूषणाची समस्या असल्याचे लक्षात आले आहे, ज्यामुळे संबंधित ठिकाणच्या मालकांना नोटीस जारी करण्यात आल्या आहेत.
याशिवाय, शहरातील इतर गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कार्यरत व्यावसायिक संस्थांची नोंद आणि परवाने याची माहिती कर संकलन विभागाकडून मागविण्यात आली आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता हरविंदर सिंग बन्सल यांनी सांगितले की, ''शहरातील रहिवाशांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी अनधिकृत क्लाऊड किचनची नियमित पाहणी केली जाते आणि नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांवर योग्य कारवाई केली जाईल.''
advertisement
तपासणीअंतर्गत प्रत्येक क्लाऊड किचनच्या वातावरणीय परिणामावर लक्ष ठेवले जाईल तसेच व्यावसायिक नोंदी आणि परवाने तपासले जातील. नागरिकांनीही अशा अनधिकृत क्लाऊड किचनच्या तक्रारी महापालिकेकडे कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेची ही पहिली ठोस हालचाल असल्यामुळे रहिवासी भागातील स्वच्छता, ध्वनी आणि वायुप्रदूषणावर सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.