नेमकी घटना काय?
नीलम गायकवाड (वय २२, रा. माळशिरस) असे मृत तरुणीचे नाव आहे. नीलम ही नेहमीप्रमाणे १ एप्रिल रोजी सकाळी महाविद्यालयात गेली होती. मात्र, सायंकाळ झाली तरी ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तिचा कोणताही पत्ता लागला नाही. रात्री उशिरा पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी ग्रामीण रुग्णालय गाठले, जिथे नीलमचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सासवडजवळील खानवडी गावाच्या हद्दीत घडली आहे. नीलमच्या मृतदेहावर गंभीर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या असून, तिचा गळा दाबून खून केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अनिकेत विष्णू जाधव (रा. माळशिरस) याने नीलमवर अत्याचार करून तिची हत्या केली आहे.
सासवड पोलिसांनी या प्रकरणी अनिकेत विष्णू जाधव याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी तपास पथके रवाना केली असून, आरोपीला कडक शिक्षा करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
या घटनेमुळे महाविद्यालयीन तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलिसांनी या प्रकरणाचा जलदगतीने तपास सुरू केला आहे.
