नीरज मुळचे मॅकेनिकल इंजिनिअर. पण कॉर्पोरेट नोकरींपेक्षा समाजाशी जोडलेलं काहीतरी वेगळं करण्याची इच्छा मनात होती. महिलांसाठी रोजगाराची संधी निर्माण करावी आणि आपल्या पारंपरिक कलेला बाजारपेठ मिळवून द्यावी, या द्वैतातून घोंगडी.कॉमची कल्पना आकाराला आली. त्यावेळी घोंगडी आणि गोधडी तयार करणारे कारागीर कमी होत चालले होते. मागणी कमी, मजुरी कमी, त्यामुळे ही सुंदर हातकला नामशेष होण्याच्या मार्गावर होती. पण नीरज यांनी ती कला पुन्हा जिवंत करण्याचा ध्यास घेतला. 2016 मध्ये फक्त दोन कारागीरांसोबत सुरू झालेल्या या उपक्रमात आज नऊ राज्यांतील कारागीर काम करतात.
advertisement
महाराष्ट्र, कर्नाटक, सिक्कीम, आसाम, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बारामती अशा विविध भागांतून पारंपरिक तसेच आधुनिक डिझाइनची गोधडी आणि घोंगडी तयार केली जाते. घोंगडीचे जवळपास 15 प्रकार तर गोधडीचे 45 पेक्षा अधिक प्रकार इथे उपलब्ध आहेत. काही 150 ते 200 वर्षे जुन्या पारंपरिक गोधडींची पुन:र्निर्मितीही त्यांनी केली आहे. बाजारपेठ मिळवून देण्यासाठी नीरज यांनी ऑनलाइन विक्रीला चालना दिली. वेबसाईट, सोशल मीडिया, प्रीमियम ग्राहकवर्ग, परदेशातील NRIs यांच्यापर्यंत या भारतीय वस्त्रकलेची ओळख पोहोचवली. परिणामी आज घोंगडी.कॉमच्या उत्पादनांना ऑस्ट्रेलिया, अमेरिका, दुबईसह 19 देशांत मागणी आहे.
भारतीय घरांच्या आठवणी, ग्रामीण संस्कृतीचा सुगंध आणि हातमागाची कलाकुसर या तिन्हींचा संगम असल्यामुळे ही उत्पादने परदेशात विशेष लोकप्रिय ठरत आहेत. घोंगडी आणि गोधडींच्या किंमती 1600 रुपयांपासून सुरू होतात. त्यांच्या कलेकडे पाहता, गुणवत्तेवरची पकड आणि टिकाऊपणा पाहता ग्राहक वर्ग या वस्तूंना उत्तम प्रतिसाद देतो. वार्षिक उलाढाल 70 ते 80 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. एका इंजिनियर तरुणाने पारंपरिक कलेला आधुनिक बाजारपेठेशी जोडत 350 कुटुंबांना रोजगार मिळवून दिला हे निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
नीरज म्हणतात, कला लुप्त होते तेव्हा कलाकारही हरवतात. त्यांना काम आणि सन्मान मिळाला तर ही परंपरा पुन्हा फुलू शकते.त्यांचा हा दृष्टिकोनच घोंगडी.कॉमला वेगळं स्थान देतो. आजच्या काळात स्टार्टअप्स तंत्रज्ञानावर आधारित असतात. पण नीरज बोराटे यांनी दाखवून दिलं की परंपरा, हातकला आणि सांस्कृतिक वारसा हेदेखील व्यवसायाचे बलस्थान ठरू शकतात, आणि समाजालाही त्यातून लाभ मिळू शकतो. त्यांच्या या प्रवासातून अनेक तरुणांना दिशा मिळेल, आणि हरवत चाललेल्या अनेक कलेना पुन्हा नवं आयुष्य मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.