प्रवाशांना होणार मोठा फायदा
सध्या हडपसर स्थानकावर तीन फलाट असून, येथून दररोज सुमारे चार हजार प्रवासी प्रवास करतात. नवीन फलाटामुळे हडपसर, मांजरी, वाघोली, खराडी आणि मगरपट्टा सिटी परिसरातील प्रवाशांना लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी मुख्य पुणे स्थानकावर जाण्याची गरज पडणार नाही. आयटी कंपन्यांत काम करणाऱ्या नोकरदार वर्गासाठी हे टर्मिनल अत्यंत सोयीचे ठरणार आहे. एक फलाट वाढल्यामुळे दिवसभरात किमान ३ ते ४ नवीन गाड्यांची सोय होणे शक्य होणार आहे.
advertisement
काय आहे रेल्वेचा प्लॅन?
सध्या ४०० मीटर लांबीच्या (१४ डब्यांच्या गाड्यांसाठी) फलाटास मंजुरी मिळाली असली तरी, रेल्वे प्रशासन २४ डब्यांच्या गाड्यांसाठी ६५० मीटर लांबीच्या फलाटासाठी आग्रही आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच निविदा काढल्या जातील.
रेल्वे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा विस्तार हडपसर स्थानकाची कार्यक्षमता वाढवणारा असून, नवीन गाड्या सुरू करण्यासाठी किंवा सध्याच्या गाड्यांचे थांबे वाढवण्यासाठी प्रशासनाला तांत्रिकदृष्ट्या अधिक सोपे जाणार आहे. लवकरच या स्थानकावरून रेल्वेगाड्यांची संख्या वाढणार असल्याने पुणेकरांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
