पुणे : पुण्यात मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. तसेच अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने जीवनाश्यक वस्तूंचे अतोनात नुकसान झाले आहे. लोकल18 च्या टीमने घटनास्थळाचा आढावा घेतला तेव्हा नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत घडलेला सर्व प्रकार सांगितला.
पुण्यातील सिंहगड परिसरात काय घडलं -
पुण्यात खडकवासला धरणाचा साठा 100 टक्के जवळपास झाल्याचा अंदाज आल्यानंतर या धरणातून 40 हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला होता. काल 9 हजार क्युसेक विसर्ग केल्यावर पुणेकरांना सतर्कतेचा तसेच पूररेषेच्या जवळपास असलेल्या घरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याची सूचना देण्यात आली होती. मात्र, सकाळच्या सुमारास अचानकपणे पाण्याचा वेग वाढला आणि यामुळे लोकांना पर्जन्य परिस्थितीचा सामना करावा लागला. येथील स्थानिकांना या पाण्याच्या विसर्गाबद्दल कुठलीच कल्पना नसल्याचे मत आणि कुटुंबातील लोकांनी व्यक्त केले. पुण्यातील सिहंगड परिसरातील आनंदनगर भागात हा सर्व प्रकार घडला.
advertisement
धरणाचे पाणी सोडल्यानंतर अनेक अपार्टमेंट पाण्यात बुडाली. अनेकांचे घरगुती साहित्यसुद्धा वाहून गेले. काहींच्या गाड्या वाहून गेल्या. तर काहींच्या गाड्या पाण्यात बुडून त्यांचे नुकसान झाले. याबरोबरच तीन लोकांना शॉक लागून आपला जीव गमवावा लागला. याबरोबरच काही जनावरेही या पुरामध्ये बांधलेल्या ठिकाणी दगावली.
या संपूर्ण प्रकरणाची व पूरजन्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद नगर, एकता नगर परिसरामधील नुकसानग्रस्त कुटुंबांशी संवाद साधला व पाहणी केली. तसेच रात्री 9 नंतर जलविसर्ग सोडला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
मदतीची मागणी -
2011 साली अशी परिस्थिती उद्भवली होती. मात्र, आता खूप जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. टीव्ही, बेड कपाट हे सर्वच भिजलं आहे. अचानक सगळं झाल्यामुळे काहीच करता येत नाही. आम्ही घरात 5 लोक आहोत. घरात मुलगा एकटाच कमवतो. त्यामुळे आम्हांला याची नुकसान भरपाई ही मिळाली पाहिजे, अशा भावना एका कुटुंबाने नागरिकांनी व्यक्त केल्या.
सिहंगडवरील आनंद नगरमध्ये सकाळी 7 वाजता पाणी शिरले. पाणी शिरल्यावर आम्हाला काहीच सुचले नाही. बेड, कपाट, वाशिंग मशीन, धान्य या साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामा करून प्रशासनाने आम्हाला मदत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. भारतीय हवामान विभागाने पुणे, सातारा या जिल्ह्यात पुढील 24 तासाकरिता अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्क रहावे व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे मंत्रालय नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले आहे.





